चोरीला गेलेला बैल हवाय? जन्माचा दाखला द्या .. पोलिसांच्या अजब प्रश्नाने मालक चक्रावला, चोरट्या
किरण: रायगड जिल्ह्यातील नेरळ परिसरातून एक अचंबित करणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. चोरीला गेलेल्या बैलाची तक्रार घेऊन गेलेल्या शेतकऱ्यालाच पोलिसांनी “बैलाचा जन्मदाखला आणा” असा प्रश्न विचारल्याने सर्वच स्तरांवर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अंजप गावातील तानाजी माळी या शेतकऱ्याच्या घराच्या अंगणातून रविवारी पहाटेच चोरट्यांनी त्यांचा बैल पळवून नेल्याची घटना घडली.
Raigad Crime: नेमका प्रकार काय?
या संपूर्ण चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाला आहे. फुटेजमध्ये तीन ते चार गोतस्कर पावाचे तुकडे टाकून बैलाला घराच्या अंगणातून बाहेर खेचत नेत असल्याचं दिसतं. त्यानंतर त्यांनी बैलाला एका आलिशान वाहनात बसवलं आणि पळ काढला. सकाळी उठल्यावर तानाजी माळींना बैल चोरीला गेल्याचं लक्षात आलं. त्यांनी तात्काळ नेरळमधील कशेळे पोलिस चौकीत तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली, मात्र तिथे पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली.
न्याय मिळवण्यासाठी माळी यांनी पुढे कर्जत पोलिस ठाण्यात धाव घेतली, पण तिथे त्यांना आणखी विचित्र अनुभव आला. पोलिसांनी त्यांना विचारलं, “बैलाचा जन्मदाखला आहे का? दाखला आणा मग तक्रार घेतो!” हा प्रश्न ऐकून शेतकरी अक्षरशः चक्रावून गेला. चोरीला गेलेल्या प्राण्याचा जन्मदाखला दाखवायचा हा प्रकार ऐकून उपस्थित नागरिकही थक्क झाले. या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. “बैल चोरीला गेला, पोलिसांकडे तक्रार द्यायला गेलो तर ते जन्मदाखला मागतात! मग न्याय मागायचा कुणाकडे?” असा सवाल स्थानिक शेतकरी संतापाने विचारत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नेरळ, कर्जत आणि आजूबाजूच्या भागात जनावरांच्या चोरीच्या घटना वाढल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. गोतस्करांच्या टोळ्या उघडपणे फिरत आहेत, मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. दरम्यान, चोरीचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला असून, शेतकरी आणि ग्रामस्थांनी संबंधित चोरट्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.