महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या जिल्ह्यात 272 बालके कुपोषित

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यात कुपोषणाचे संकट कायम आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कुपोषित बालकांची संख्या वाढली असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे. कुपोषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करूनही कुपोषण आटोक्यात आलेले नाही. महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात 272 कुपोषित बालके आढळली असून, यामधील 44 बालके तीव्र कुपोषित तर 228 बालके सौम्य कुपोषित आहेत.

जिल्हा महिला व बालकल्याण विभाग तसेच आरोग्य विभागाकडून सहा वर्षांपर्यंतच्या बालकांची तपासणी करण्यात येते. या तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील कुपोषणाची आकडेवारी चिंताजनक असल्याचे उघड झाले आहे. तपासणी करण्यात आलेल्या 14 हजार 623 बालकांपैकी 272 बालके कुपोषित आढळून आली आहेत. कुपोषणावर मात करण्यासाठी सरकारतर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी कोट्यवधींचा खर्चही करण्यात आला आहे. अंगणवाडी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये पोषण आहार पुरविण्यात येतो. तसेच सरकारी रुग्णालये व जिल्हा परिषदेमार्फत महिला व बालकल्याण विभागामार्फत कुपोषित बालकांवर उपचार करण्यासाठी ठिकठिकाणी बालसंगोपन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.

बालकांचे कुपोषण

बालकांचे कुपोषण थांबवण्यासाठी इतकी मोठी तरतूद केली असतानाही जिल्ह्यात कुपोषणावर मात करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. कुपोषित बालकांची संख्या वाढल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आदिवासी विभागाकडून पोषण आहार योजनेसाठी केल्या जाणाऱ्या आर्थिक तरतुदीत झालेली घट, कुपोषण निर्मूलनासाठी गावपातळी, तालुकापातळीवरील समित्याच अस्तित्वात नसणे, शासनाकडून वाटप करण्यात येणारी पाकिटे खाण्यास मुलांची उदासीनता हेदेखील कुपोषण समस्येमागील काही महत्त्वाची कारणे असल्याची बाब समोर आली आहे.

Comments are closed.