राज ठाकरे निर्दोष… रेल्वे भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना मारहाण केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत
रेल्वे भरती आंदोलनप्रकरणी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सात कार्यकर्त्यांची ठाणे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. राज ठाकरे यांची सबळ पुराव्याअभावी सुटका करण्यात आली असून तब्बल 18 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. राज ठाकरे यांनी केलेले कथित चिथावणीखोर वक्तव्य तसेच रेल्वे भरतीसाठी आलेल्या परप्रांतातील उमेदवारांना मारहाण केल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
2008 मध्ये रेल्वे भरतीसाठी कल्याण रेल्वे स्थानकात आलेल्या परप्रांतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांसह अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कल्याण न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. तो नंतर ठाणे न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला. आज न्यायमूर्ती अभिजित कुलकर्णी यांनी ठाणे कोर्टात अंतिम सुनावणी घेऊन राज ठाकरे यांची व मनसेच्या अन्य कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका केली.
तीन वेळा हजेरी
आज राज ठाकरे ठाणे न्यायालयात येणार म्हणून तुफान गर्दी झाली होती. तसेच मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. या खटल्यासाठी स्वत: राज ठाकरे हे यापूर्वी तीन वेळा ठाणे न्यायालयात हजर झाले होते. गेल्या वेळेस त्यांनी मारहाणीचा तसेच चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा गुन्हा आपणास मान्य नसल्याचे न्यायमूर्तींना स्पष्टपणे सांगितले होते.
‘त्या’ सीडीला कवडीचीही किंमत नाही
रेल्वे भरतीसाठी कल्याण रेल्वे स्थानकात जमा झालेल्या परप्रांतीय उमेदवारांवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा पुरावा म्हणून सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयात सीडी सादर केली होती. मात्र या सीडीला आपण कवडीचीही किंमत देत नसल्याचे आज न्यायमूर्तींनी सांगितले. एवढेच नव्हे तर एखाद्या कार्यकर्त्याच्या खिशात मनसेचे ओळखपत्र सापडले म्हणजे तो मनसेचा कार्यकर्ता आहे हेही सिद्ध होत नसल्याचे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.
Comments are closed.