बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव होताच राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांन

राज ठाकरे आणि देवेंद्र फड्नाविस: मनसेप्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Raj Thackeray Meet Devendra Fadnavis) यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहचले आहेत. आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) वर्षा या निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भेटीसाठी पोहचले. नागरिकांच्या विविध प्रश्न घेऊन राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांकडे पोहचले आहेत. मात्र काल बेस्ट पतपेढी निवडणूक झाली. या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला आणि आजच राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहचल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत (BEST Election) ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला. त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती. या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी ब्रँड ठाकरेची खिल्ली उडवत टीकेची झोड उठवली होती. मात्र, भाजपचे नेते फक्त उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य करताना दिसत होते. राज ठाकरे यांच्याबाबत त्यांच्या बोलण्यात सहानुभूती आणि सॉफ्ट कॉर्नर दिसून आला होता. एकाही भाजप नेत्याने राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याची हिंमत केली नव्हती. त्यामुळे भाजपला राज ठाकरे अजूनही आपल्याकडे परततील, अशी आशा असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनीही भाजप आणि महायुतीकडे परत जाण्याचे दोर अजून पूर्णपणे तोडलेले नाहीत, अशी नवी चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या या बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राज ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची याआधीही झालेली गुप्त भेट-

यापूर्वी शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा सुरु असताना 12 जून रोजी वांद्र येथील ताज लँडस् हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त भेट झाली होती. या भेटीत उभय नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली होती.  मात्र, त्यानंतर राज ठाकरे हे वरळीतील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर एकत्र दिसून आले होते. त्यानंतर शिवसेना आणि मनसे युतीच्या वाटाघाटींना वेग आला होता. मात्र, आता बेस्ट पतपेढी निवडणुकीतील दारुण पराभव आणि देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीने शिवसेना-मनसेच्या युतीच्या प्रक्रियेला पुन्हा ब्रेक लागणार का, हे बघावे लागेल.

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ‘ठाकरे ब्रँड’चा पुरता धुव्वा-

सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेच्या बेस्ट पतपेढीचा निकाल समोर आला. या निवडणुकीत ‘ठाकरे ब्रँड’चा पुरता धुव्वा उडाला. 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरेंचे सर्व उमेदवार पराभूत झाले. शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी झाले. महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार ही निवडणूक जिंकले. या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच उद्धव आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र आले होते. ‘ठाकरे ब्रँड’ म्हणून निवडणुकीत प्रचंड गाजावाजा झाला. मात्र ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही.

मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे दोघंही टायमिंग साधण्यात माहिर आहेत. दोघांमध्ये भेट नेमकी कोणत्या विषयावर होतेय, याची माहिती राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसचं देऊ शकतात, असं मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत म्हणाले. तसेच राज ठाकरे महायुतीमध्ये यावेत, अशी आमची इच्छा आहे, असंही उदय सामंत म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?

विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले. त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल तर होऊ द्या, असं शिवसेना ठाकरे गटाते खासदार संजय राऊत म्हणाले. राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस अनेकदा भेटले आहेत.  कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील. राज्यातील विविध प्रश्नावर चर्चा सुरू असेल, असं संजय राऊत म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=zc7nhdkew8i

संबंधित बातमी:

BEST Election Result: राज ठाकरे नव्हे, टार्गेटवर फक्त उद्धव ठाकरे; बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीनंतर ‘सेनाभवन’बाहेर काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.