बरा आहेस ना रे…, कुठे लागलं नाही ना?; माझे काका म्हणत राज ठाकरेंचा ‘सामना’मध्ये बाळासाहेबा
राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर : हिंदूहृदयसम्राट आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 100 वी जयंती (Balasaheb Thackeray Jayanti) आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त देशभरातील राजकीय नेते, कलाकार, क्रीडापटू अभिवादन करत आहेत. याचदरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दैनिक सामनासाठी विशेष लेख लिहिला आहे. यामध्ये माझे काका…असं म्हणत राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या अनेक आठवणी जागवल्या.
काय म्हणाले राज ठाकरे? (राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर)
बाळासाहेबांच्या कुंचल्याचे फटकारे, ज्यामध्ये अग्रलेखापेक्षा जास्त ताकद होती. त्यांच्या या कलेला जागतिक मान्यता मिळाली, पण आपल्या देशात त्यांची योग्य कदर कधी झालीच नाही. खरं तर, ‘बाळासाहेब ठाकरे’ हा विद्यापीठांमधून शिकवण्याचा विषय आहे, पण आपल्याकडे तशी मानसिकताच धोरणकर्त्यांमध्ये नाही. २००५ साली मी पक्ष सोडला आणि साल २००६…जानेवारी महिन्यात मी राज्यव्यापी दौन्यावर निघालो प्रवासात असताना मोबाईल वाजला… मी फोन घेतला, पलीकडून आवाज आला, ‘बरा आहेस ना रे…?’ बाळासाहेब काळजीच्या स्वरात विचारत होते. मी हो म्हटलं. ‘कुठे लागलं नाही ना?’ लगेच पुढचा प्रश्न आला. खरं तर, आमच्या गाडीला ट्रकची धडक बसणार होती, पण तसं झालं नाही. आम्ही बचावलो, सुखरूप होतो, पण बातमी ‘मातोश्री’ पर्यंत गेली होती. म्हणूनच काकाच्या आवाजात काळजी होती.
मी लहान असताना उकळतं पाणी अंगावर पडून भाजलो होतो ते दिवस आठवतात. मी तेव्हा ‘मातोश्री’वरच राहायला होतो. औषधं सुरू होती. मानेवर, पाठीवर फोड आले होते. तेव्हा रोज सकाळी बादलीभर पाणी, कापूस, डेटॉल घेऊन काका माझ्याबरोबर बसायचा. जखमा डेटॉलने धुऊन काढायचा. दोन महिने अशी माझी शुश्रूषा त्याने केली. मी जेव्हा वेगळी राजकीय चूल मांडली तेव्हा मला सर्वात जास्त त्रास एकाच गोष्टीचा होत होता, की माझ्या माणसांना आता पूर्वीसारखं मला भेटता येणार नाही. वडिलांचं छत्र हरपलं होतं आणि आता मी माझ्या काकापासून पण दूर गेलोय, हाच विचार मनाला खात होता. पक्षातून बाहेर पडणं, यापेक्षा माझं घरातून बाहेर पडणं, त्यार्च जास्त होतं. बाळासाहेब केशव ठाकरे…माझा काका…माझं बालपण, तरुणपण त्याने व्यापलं होतं. तो माझ्यासाठी नेहमी पहाडासारखा उभा राहिला.
बाळासाहेबांचं माझ्याकडे बारीक लक्ष असायचं- (Raj Thackeray On Balasaheb Thackeray)
मी जेव्हा राजकीय आंदोलनात उतरलो तेव्हाही बाळासाहेबांचं माझ्याकडे बारीक लक्ष असायचं. एक प्रसंग सांगायलाच हवा. प्रसंग आहे माझ्या पहिल्या जाहीर भाषणाचा. १९९१ सालची गोष्ट. काळा घोडा इथे फीवाढीच्या विरोधात मी मोर्चा काढला होता. मोर्चा झाला, भाषणं झाली आणि सगळी पांगापांग होत असताना कुणीतरी येऊन सांगितलं की, आमची माँ (मीनाताई ठाकरे) आली आहे. मोर्ध्यामध्ये माँ कशासाठी आली असा प्रश्न पडला, म्हणून जाऊन भेटलो, तर कळलं की माँ गाडीत बसून माझं भाषण ऐकत होती. दुपारचे तीन वाजले होते. तिने सांगितलं की घरी चल, काका वाट बघतोय. मी तिच्याबरोबर गेलो, बाळासाहेबांनी समोर बसवलं आणि म्हणाले की, मी तुझं भाषण ऐकलं. आता ११ साली लाईव्ह भाषण वगैरे ऐकायची कुठलीही सोय नव्हती, मग बाळासाहेबांनी भाषण कसं ऐकलं हे मी त्यांना विचारलं तर कळलं की, मौर्चा होता तिथे बाजूला पानटपरीमध्ये पब्लिक फोन होता. तिथून कोणीतरी फोन करून लाऊडस्पीकरवरून माझं भाषण बाळासाहेबांना ऐकवलं होतं ! पुढे बाळासाहेबांनी जे सांगितलं ते जसंच्या तसं माझ्या डोक्यात घट्ट बसलेलं आहे. बाळासाहेब म्हणाले, “आपण किती हुशार आहोत. ते न सांगता समोरचे कसे हुशार होतील हे आपल्या भाषणातून गेलं पाहिजे. आज मी त्यांना विचार करायला काय दिलं ते महत्त्वाचं… ज्या मैदानावर सभा असेल, त्या मैदानाची भाषा बोल, आपली भाषा बोलू नकोस. इलकं सोपं बोल की कुंपणावर बसलेल्या शेतकऱ्यालाही कळलं पाहिजे.”
अमिताभ यांना बाळासाहेबांनी पहिला प्रश्न विचारला…- (Raj Thackeray On Balasaheb Thackeray Jayanti)
बाळासाहेब असं खूप मोलाचं सांगायचे आणि मी ते वेचत असायचो, त्यामुळे खूपच फायदा झाला. कलाकाराचं मन होतं त्याचं… त्यामुळे कलाकारांमध्ये मनसोक्त रमायचा. साल १९७०… त्यावेळी शिवसेना आणि कम्युनिस्ट यांच्यात जोरदार संघर्ष सुरू होता. त्याच काळात राज कपूर यांचा ‘मेरा नाम जोकर’ चित्रपट प्रदर्शित व्हायचा होता. कम्युनिस्ट रशियामध्ये तेव्हा राज कपूर लोकप्रिय होते. ‘मेरा नाम जोकर’मधील काही प्रसंग हे कम्युनिस्टधार्जिणे आहेत असं बाळासाहेबांच्याही कानावर आलं होतं. तेव्हा राज कपूर यांनी बाळासाहेबांना सांगितलं की, तुम्ही एडिटिंगला बसा आणि तुम्हाला जे प्रसंग खटकतील ते मी काढून टाकतो. बाळासाहेबांनी ज्या सूचना केल्या त्यानुसार चित्रपटात बदल करण्यात आले, इतके त्यांचे संबंध चांगले होते. हा प्रसंग मी थेट बाळासाहेबांकडून आणि माझ्या वडिलांकडून ऐकलेला आहे. माझ्यासमोर घडलेले बरेच असे प्रसंग आहेत, ज्यातून बाळासाहेब आणि चित्रपटसृष्टी यांच्यातला स्नेह मला जाणवायचा. अर्थात, तो काळही वेगळाच होता. आत्तासारखं बरबटलेलं, बुरसटलेलं वातावरण नव्हतं. एकमेकांच्या त्तत्त्वांचा आदर ठेवून वागणारी माणसं होती ती…माझ्यासमोर घडलेला एक प्रसंग सांगतो. बोफोर्स प्रकरणावरून जेव्हा रान उठलं होतं, तेव्हा अमिताभ बच्चन आणि त्यांचे बंधू अजिताभ है बाळासाहेबांना भेटायला ‘मातोश्री’ वर आले होते. अमिताभ तेव्हा चिंताग्रस्त दिसत होते. ‘बोफोर्स’ खरेदी घोटाळ्यात त्यांचंही नाव गोवलं गेलं होतं आणि देशभरातील वर्तमानपत्रांतून त्यांच्यावर टीका होत होती. अमिताभ यांना बाळासाहेबांनी पहिला प्रश्न विचारला, ‘या प्रकरणात खरंच तू निर्दोष आहेस का?’ त्यावर अमिताभ यांनी बाबूजींची म्हणजेच हरिवंशराय बच्चन यांची शपथ घेत सांगितलं की, या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. मग बाळासाहेबांनी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना एक पत्र पाठवा असं अमिताभ यांना सांगितलं आणि पत्राचा मसुदाही तयार करून दिला. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला पत्र लिहिताना ते कसं लिहायचं याचा बाळासाहेबांचा अभ्यास होता आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतंच. अमिताभ बच्चन यांचं ते पत्र व्ही. पी. सिंग यांच्याकडे गेलं आणि तिथपासून वातावरण निवळायला सुरुवात झाली. बाळासाहेबांचा करिष्मा हा असा होता. बाळासाहेब हे मराठी माणसाला जसे आधार वाटायचे, तशीच भावना या सर्व कलाकारांचीही असायची. राजेश खन्ना यांना अनेकदा ‘मातोश्री’वर बाळासाहेबांशी गप्पा मारताना मी बघितलंय. एक सुपरस्टार आणि एक राजकारणी, असं मुळीच जाणवायचं नाही. राजकारण बाजूला ठेवून बाळासाहेब जुन्या आठवणींमध्ये रमायचे. स्वतःच्या नावाचा दरारा जाणवू न देता, बाळासाहेबांनी ज्याप्रकारे मैत्री टिकवली, तो दिलदारपणा… हे त्यांचं खास वैशिष्ट्य होतं. कलाकार आणि कलेबद्दल त्यांना विशेष आपुलकी होती.
मायकल जॅक्सनच्या भेटीत काय घडलं? (Raj Thackeray On Balasaheb Thackeray)
मायकल जॅक्सन यांची कॉन्सर्ट जेव्हा मुंबईत झाली. त्यापूर्वी बाळासाहेबांना त्याबद्दल कल्पना नव्हती, पण त्यावेळी मी एक गोष्ट आवर्जून केली. मायकल जॅक्सन यांचं जेव्हा भारतात आगमन होईल तेव्हा ते आधी बाळासाहेबांना भेटतील अशी अट मी घातली होती. मायकल जॅक्सन यांच्या टीमने तेव्हा बाळासाहेबांबद्दल रिसर्च केला होता. बाळासाहेब ठाकरे ही भारतातील किती महत्त्वाची व्यक्ती आहे हे त्यांना समजलं होतं आणि तसाच आदर मनात ठेवून मायकल जॅक्सन बाळासाहेबांना भेटले होते. ती भेट ठरल्याप्रमाणे झाली. तिथून मायकल जॅक्सन हे ओबेरॉय हॉटेलात गेले, मग कॉन्सर्ट झाली, पण मायदेशी परतण्यापूर्वी त्यांनी निरोप पाठवला की, काल खूप गर्दी झाल्यामुळे बाळासाहेबांना नीट भेटता आलं नाही, त्यांना पुन्हा एकदा भेटायचंय, आले. छान गप्पा झाल्या. अगदी तिथल्या दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा ‘मातोश्री’वर पोलिसांबरोबर फोटोही काढले आणि मगच ते विमानतळाकडे रवाना झाले.पहिल्या भेटीच्या वेळेस छायाचित्रकार होते, नेते होते. गर्दी होती… पण तेवढ्या वेळेतही बाळासाहेब जे काही बोलले असतील, त्यातून पुन्हा भेटण्याची, थोड्या निवांत गप्पा मारण्याची इच्छा मायकल जॅक्सन यांना झाली. एवढ्या एका घटनेवरून लक्षात येईल की बाळासाहेब ठाकरे या नावाचं गारुड काय होतं ते…बाळासाहेबांना कलेची जाण होती. कलेबद्दल आदर होता. देश, भाषा यांच्या सीमा कधी त्या प्रेमाच्या आड आल्या नाहीत. पाकिस्तानला विरोध करताना त्यांनी कधीच घरात वाजणारी मेहंदी हसन, गुलाम अली यांची गझल बंद केली नाही. दोन देशांचे संबंध बिघडलेले असताना आजही मी आणि माझा पक्ष, जेव्हा पाकिस्तानी कलाकार किंवा खेळाडूंच्या भारतातील इव्हेंट्सना विरोध करतो, तेव्हा तो विरोध त्या कलाकाराला किंवा खेळाडूला कधीच नसतो. हे बाळासाहेबांनीच केलेले संस्कार आहेत. मी नेहमीच हे सांगत आलोय, की संस्कार केले जात नाहीत, ते वेचावे लागतात. बाळासाहेबांना मी लहानपणापासून जवळून बघितलंय. त्यांनी कधीच राजकीय ताणतणाव घरी आणले नाहीत. बाहेर कितीही राजकीय गदारोळ असू दे, त्याचा कुटुंबावर कधी परिणाम त्यांनी जाणवू दिला नाही. घरी ते अगदी कुटुंबवत्सल भूमिकेत असायचे. थट्टा-मस्करी अगदी नेहमीसारखी चालायची. या त्यांच्या वागण्याचेही नकळत संस्कार माझ्यावर झालेले आहेतच.
लहानपणी बाळासाहेब मला ‘टिनू’ म्हणायचे…- (Raj Thackeray On Balasaheb Thackeray Jayanti)
व्यंगचित्रांच्या बाबतीतही तसंच झालं. १९८० सालची गोष्ट… लहानपणी बाळासाहेब मला ‘टिनू’ म्हणायचे, मी तेव्हा सातवीत होतो. शाळेतून घरी आलो, परत बाहेर खेळायला पळायचं होतं, पण बाळासाहेबांनी Inking करायचा आदेशच दिला. त्यावेळी ‘मार्मिक’मधल्या ‘रविवारची जत्रा’चं स्केचिंग बाळासाहेब करायचे आणि Inking माझे वडील करायचे. बाळासाहेबांनी मला पेनाने Inking करायला सांगितलं. त्या आठवड्यात ‘रविवारच्या जत्रे’ची कॅप्शन होती… ‘आमच्या टिन्याने चितारलेलं उद्याचं चित्र.’ १९८३ सालची गोष्ट… आर. के. लक्ष्मण यांनी काढलेलं व्यंगचित्र समोर ठेवून बाळासाहेब म्हणाले, ‘लक्ष्मणने हा स्ट्रोक बघ कसा मारलाय, पण तू तसा मारायला जाऊ नको.’ पुढचं त्यांचं वाक्य महत्त्वाचं होतं. ‘या चित्रातला इफेक्ट घे, त्यातले डिफेक्ट्स घेऊ नकोस…’ आता आजही जेव्हा मी कुठलं चित्र बघतो तेव्हा आपोआप त्यातले इफेक्ट आणि डिफेक्ट कळायला लागतात. माझ्या हातून उमटलेली रेषा त्यांना आवडत होती, म्हणूनच ते मला शिकवत गेले. मी सांगितलेली एखादी व्यंगचित्राची कल्पना त्यांना आवडली तर म्हणायचे की, कल्पनेत तयार होतोयस. बातमीतून कल्पना सुचणं आणि कल्पनेतून व्यंगचित्रं उभं राहणं, ही प्रक्रिया त्यांच्यामुळेच हळूहळू जमायला लागली होती. माझे स्ट्रोक्स त्यांना आवडायचे. १९८५ ते १९९५ अशी दहा वर्ष ‘मार्मिक’ व्यंगचित्रांची जबाबदारी मी सांभाळली. असंच नियमित मी व्यंगचित्रं काढावीत असं बाळासाहेबांना वाटायचं.’तुझी व्यंगचित्रं बघून बाळासाहेबांची आठवण येते’ असं जेव्हा मला म्हणतात तेव्हा मला प्रश्न पडतो की, यांना बाळासाहेब हे किती मोठे व्यंगचित्रकार होते हे खरंच कळलंय का?
बाळासाहेबांचा हाच कणखर बाणा…- (Raj Thackeray On Balasaheb Thackeray)
बाळासाहेबांच्या स्ट्रोकची ताकद आणि त्याचा दर्जाही त्यांना कळत नाही, असंच म्हणावं लागेल. इथे एक गोष्ट ठासून सांगायला हवी. शिवसेना पक्ष आणि संघटना ज्या काळात वाढत होती, आंदोलनं, भाषणं, राडे, बंदची हाक, कोर्ट-कचेऱ्या, तुरुंगवास… अशी सगळी रणधुमाळी सुरू होती, त्यात बाळासाहेबांचा अर्थातच सक्रिय सहभाग होता. अशा संघर्षाच्या काळात आणि गदारोळात त्यांनी व्यंगचित्रांच्या दर्जाशी कधी तडजोड केली नाही. ‘मार्मिक’मध्ये त्या काळातली व्यंगचित्रं काढून बघा, एकही रेषा कुठे हललेली नाही. कसं तरी झटपट आटपलंय असा प्रकारच नाही. कितीही राजकीय ताण असला, तरी त्यांची व्यंगचित्रं तितकीच टोकदार असायची. बाळासाहेबांची व्यंगचित्रकला म्हणजे त्यांची राजकीय समाधी लागायची. त्या एकाग्र विचारातून जी व्यंगचित्रं अवतरली ती खरंच अद्भुत आहेत. मांडी घालून बसलेले बाळासाहेब… हातात पहिली पेन्सिल आणि नंतर ब्रश, समोर कोरा कागद आणि त्या कागदावर हळूहळू उमटणारी रेषा…. धारदार आणि एकदम ठाम रेषा, कधी टीका होत असेल, निवडणुकांमध्ये पराभव होत असतील, पण म्हणून कल्पना सुचणं हे कधीच थांबलं नाही. व्यंगचित्रं नियमितपणे येतच राहिली. बाकीच्या कलाकारांकडे जशी वेळेची मुबलकता असते तशी बाळासाहेबांकडे कुठे होती ? म्हणूनच ते सर्वश्रेष्ठ व्यंगचित्रकार होते आणि राहतील. बाळासाहेबांचा हाच कणखर बाणा लहानपणापासून मी बघितला नसता तर स्वतंत्र राजकीय पक्ष काढायची हिंमतच मी केली नसती. निवडणुकीत पराभव होतो, लोकं टीका करतात, पण एक वेळ अशी येईल की हीच माणसं चांगलं बोलतील, हा विश्वास बाळासाहेबांमुळेच माझ्यामध्ये आहे.
जन्मशताब्दी वर्षात बाळासाहेबांना केवळ आठवू नये, तर…- (Raj Thackeray On Balasaheb Thackeray)
बाळासाहेब ठाकरे किंवा आर. के. लक्ष्मण यांच्यासारखे कलाकार हे या देशात जन्माला आले हे आपल्या देशाचं भाग्य आहे. बाळासाहेबांच्या कुंचल्याचे फटकारे, ज्यामध्ये अग्रलेखापेक्षा जास्त ताकद होती. त्यांच्या या कलेला जागतिक मान्यता मिळाली, पण आपल्या देशात त्यांची योग्य कदर कधी झालीच नाही. खरं तर, ‘बाळासाहेब ठाकरे’ हा विद्यापीठांमधून शिकवण्याचा विषय आहे, पण आपल्याकडे तशी मानसिकताच धोरणकर्त्यांमध्ये नाही हेच मोठं दुर्दैव आहे. आपल्याच लोकांची आपल्याला कदर नाही, हे बघून कधी कधी वाटतं की बाळासाहेब चुकीच्या देशात जन्माला आले. सर्व वाचकांना माझं आवाहन आहे, या जन्मशताब्दी वर्षात बाळासाहेबांना केवळ आठवू नये, तर पुनः पुन्हा वाचावं, भाषणं-मुलाखती ऐकाव्यात आणि व्यंगचित्रांकडे नव्या दृष्टीने पाहावं. त्या रेषांमध्ये, त्या रेषांच्या बोल्ड फटकाऱ्यांमध्ये बाळासाहेब खऱ्या अर्थाने जिवंत आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.
https://www.youtube.com/watch?v=aWD-xg4t3qQ
Comments are closed.