उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे बाळासाहेबांच्या खोलीत गेले अन्…; मातोश्रीवर काय घडलं?, ‘सामना’तून स

राज टांकेरे-जुधव ठाकरे मातोश्री मुंबई: राजकारणात काही दिवस, काही घटना आणि काही गाठीभेटी या इतिहासात कायमस्वरुपी नोंदवल्या जातात. अशीच एक ऐतिहासिक भेट काल (27 जुलै) घडली. ही भेट होती मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Raj Thackeray-Uddhav Thackeray Matoshree). म मराठीचा की म महापालिकेचा ही चर्चा सुरु असताना कालचा म मात्र मातोश्रीचा होता.

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमित्त साधत राज ठाकरेंनी एक सरप्राईज भेट ठरवली आणि तातडीनं ती अंमलातही आणली. त्यामुळं उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचं सरप्राईजही मिळालं आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आशांना पुन्हा नव्यानं पालवी फुटली. आता ही पालवी युतीची मुळं धरणार की पुन्हा एकदा कोमेजून जाणार, याकडं सर्वांचं लक्ष आहे. याचदरम्यान शिवसेनेचं मुखपृष्ठ असणाऱ्या दैनिक सामनामध्ये ठाकरे बंधूंच्या मातोश्रीवरील 20 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय घडलं?, याबाबत माहिती देण्यात आली आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत काय घडलं?

राज ठाकरे यांनी गुलाबांचा बुके देऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोघांचीही गळाभेट झाली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या आसनासमोर दोघेही नतमस्तक झाले. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शिवसेनाप्रमुखांच्या व्यंगचित्रांवरही चर्चा झाली. जवळपास 20 मिनिटे राज ठाकरे मातोश्री निवासस्थानी होते. यावेळी दोन्ही बंधूमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या. नंतर निघतानाही उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना सोडायला बाहेर आले. सगळ्यांना हात उंचावून नमस्कार करत राज ठाकरे परतले.

बाळा नांदगावकरांच्या फोनवरुन कॉल लावला अन्…

राज ठाकरे हे आज उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर येतील, असे कोणालाही वाटले नव्हते. ठाकरेंच्या गोटात कोणीही तशी अपेक्षा केली नव्हती. मात्र, काल सकाळी राज ठाकरे यांनी अचानक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जायचे, हे ठरवले. त्यानंतर राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांच्या फोनवरुन संजय राऊत यांना कॉल लावला. ‘मी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर येत आहे’, असे सांगितले. संजय राऊत यांनी ही गोष्ट लगेचच उद्धव ठाकरे यांना सांगितली. त्यानंतर राज ठाकरे दादर परिसरातील आपल्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानावरुन बाहेर पडले आणि त्यांनी अवघ्या काही मिनिटांत मातोश्रीवर पोहोचले.

https://www.youtube.com/watch?v=bdstxl51fma

संबंधित बातमी:

VIDEO : राज ठाकरे 20 वर्षांनी मातोश्रीवर, भेटीचं ‘सरप्राईज’ मिळालं, आता युतीचं ‘गिफ्ट’ मिळणार?

आणखी वाचा

Comments are closed.