राजापूर तालुक्यातील पर्जन्यमान 20 टक्क्यांनी घटले यंदाचा पाऊस 65 टक्केच, नदीनाले कोरडे पडू लागले
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी व संगमेश्वर या तीन तालुक्यांना राज्य शासनाने दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषित केलेले असताना यंदाच्या पावसाळी हंगामात राजापूर तालुक्याने सप्टेंबर अखेपर्यंत पावसाने सरासरी गाठलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महावेध या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार ३० सप्टेंबरपर्यंत राजापूर तालुक्यात अपेक्षित पावसाच्या केवळ ६५.४७ टक्के पाऊस झाला आहे. त्यात मान्सून माघारी फिरत असल्याच्या वृत्ताने तर शहरासह तालुक्यात यंदा पिण्याच्या पाण्यासाठीही गंभीर स्थिती ओढवू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.
राजापूर तालुक्यात जून ते ऑगस्ट या काळात तालुक्याचे सरासरी ३०६८.८ मि.मि. पर्जन्यमान अपेक्षित असताना प्रत्यक्षात २०८५.२ मि.मि. म्हणजेच ६७.९५ टक्के पाऊस पडला. तर सप्टेंबर महिन्यात सरासरी ३८८.६ मि.मि. पाऊस अपेक्षित होता पण ३० सप्टेंबर पर्यंत केवळ १७८.३ मि.मि. म्हणजेच ४५.९ टक्के पाऊस झाला. अगदी ३० सप्टेंबर रोजी तालुक्यात फक्त १.९ मि.मि. पावसाची नोंद झाली. एकूण हंगाम जून पासून ३४५७.४ मि.मि. अपेक्षित सरासरीच्या तुलनेत २२६३.५ मि.मि. पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच वेळेपर्यंत २९६९.६ मि.मि. पाऊस झाला होता. म्हणजेच ८५.८९ टक्के पाऊस झाला होता. त्यामानाने यंदा पाऊस तब्बल २० टक्क्याने कमी झाला आहे. त्याचा फटका दिसत असताना उष्णतामानातही वाढ झाल्याने सप्टेंबरच्या अखेरच्या टप्प्यापासूनच त्याचा प्रभाव दिसत आहे.
दरम्यान राजापूर तालुक्यात यंदा एकूण ६२१२.६० हेक्टरवर भात आणि ६०८ हेक्टरवर नाचणीचे पीक आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भात पिकावर परिणाम होण्याची भीती शेतक-यांकडून व्यक्त होत आहे. ही आकडेवारी महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या अहवालावर आधारित आहे. यंदा पर्जन्यमान कमी होण्याच्या शक्यतेतून मार्चमध्येच राज्यशासनाने पिण्याच्या पाण्याच्या जपणूकीसाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हा परिषद, पंचायत स मित्या, नगर परिषदा आणि ग्रामपंचायतींना आतापासून त्याबाबत कठोर निर्णय व भूमिका घ्यावी लागणार असल्याचे दिसत आहे.
Comments are closed.