गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर ‘रॉयल’ विजय; पांड्या आला तरी ‘पटलन’ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव

आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला : गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या आयपीएल 2026 मधील 13व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 27 धावांनी शानदार विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि अखेर 11-11 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, पण तो संघासाठी महागात पडला. राजस्थानकडून वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी सुरुवातीपासूनच धडाकेबाज फलंदाजी करत मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या विजयासह राजस्थान रॉयल्सने सलग तिसरा विजय नोंदवला असून 6 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला असून संघावर दबाव वाढताना दिसत आहे.

पाऊस थांबला! पण जैस्वाल अन् सूर्यवंशीचं वादळ (RR vs MI Update IPL 2026)

राजस्थानची सुरुवात वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी केली. पहिलं षटक दीपक चाहर टाकत होता. या षटकात जैस्वालने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत तब्बल 22 धावा चोपल्या. त्यात 4 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. दुसरं षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह आला. त्याच्या पहिल्याच चेंडूवर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने 88 मीटर लांब षटकार ठोकत सर्वांना थक्क केलं. एवढंच नाही, तर त्याच षटकात आणखी एक षटकार मारत त्याने बुमराहवर दबाव आणला. या षटकातून एकूण 14 धावा आल्या.

वैभव सूर्यवंशी आरआर वि एमआय अपडेट आयपीएल 2026

पाचवं षटक शार्दुल ठाकूर टाकायला आला. या षटकात वैभवने 2 षटकार आणि 1 चौकार ठोकला, पण अखेरच्या चेंडूवर ठाकूरने त्याला बाद केलं. वैभव सूर्यवंशीने फक्त 14 चेंडूत 39 धावांची तुफानी खेळी केली. जवळपास 279 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत त्याने 1 चौकार आणि 5 षटकार ठोकले. यानंतर ध्रुव जुरेल 3 धावा करून एएम गझनफर चा बळी ठरला. त्यानंतर कर्णधार रियान पराग यालाही गझनफरने बाद केलं. परागने 10 चेंडूत 20 धावा केल्या. मात्र दुसऱ्या टोकाला यशस्वी जैसवाल खंबीरपणे उभा राहिला. त्याने चौकार-षटकारांची आतषबाजी करत संघाचा डाव 150 धावांपर्यंत नेला. जैस्वालने फक्त 32 चेंडूत नाबाद 77 धावांची खेळी खेळली.

मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव

151 धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या डावाची सुरुवातच धक्क्याने झाली. सलामीवीर रायन रिकलटन 8 धावा करून जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर ध्रुव जुरेलकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर अनुभवी रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र संदीप शर्माने त्याला अवघ्या 5 धावांवर पायचीत (lbw) करून माघारी धाडले. फॉर्ममध्ये असलेला सूर्यकुमार यादव देखील आज अपयशी ठरला. त्याला नांद्रे बर्गरने 6 धावांवर असताना जोफ्रा आर्चरच्या हाती झेलबाद केले. तर कर्णधार हार्दिक पंड्याने 9 चेंडूत 15 धावा केल्या, पण तोदेखील मोक्याच्या वेळी बाद झाला. रवी बिश्नोई आणि नांद्रे बर्गर यांनी प्रत्येकी 2 बळी घेत मुंबईच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले. मुंबई इंडियन्सला 11 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात 123 धावा करता राजस्थान रॉयल्सने 27 धावांनी शानदार विजय मिळवला.

हे ही वाचा –

Vaibhav Suryavanshi vs Jasprit Bumrah : पहिला चेंडू, पहिलाच षटकार…. वैभव सूर्यवंशीचा सिक्स पाहून बुमराहही अवाक्, 14 चेंडूत नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.