राजेश एक्सपोर्टसला 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला

राजेश एक्सपोर्ट्स मुंबई : सोने चांदीच्या रिफानिंगच्या उद्योगात असलेली सर्वात मोठी कंपनी राजेश एक्सपोर्टस सध्या सेबीच्या निशाण्यावर आहे. सेबीनं  राजेश एक्सपोर्टसमध्ये गेल्या 15.15 लाख कोटी रुपयांचा अपहार झाल्याच्या उल्लेख अंतरिम अहवालात केल्यानं खळबळ उडाली आहे. राजेश एक्स्पोर्टसकडून आर्थिक वर्ष 2021-25 मध्ये  15.15 लाख कोटींची अपहार केल्याचा ठपका सेबीकडून ठेवण्यात आला आहे. यानंतर या कंपनीच्या स्टॉकमध्ये घसरण सुरु आहे. राजेश एक्सपोर्टस 1995 मध्ये शेअर बाजारात लिस्ट झाली.  गेल्या तीन वर्षात या कंपनीच्या स्टॉकमध्ये 90 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. या कंपनीचा शेअर 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर आला आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या दहा वर्षात म्युच्युअल फंड आणि इतर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी राजेश एक्सपोर्टसमधील गुंतवणूक कमी केली असली तरी दुसरीकडे एलआयसीनं मात्र पाच पट गुंतवणूक वाढवली.

Rajesh Exports : 10 वर्षात LIC ची गुंतवणूक पाच पट वाढली

गेल्या 10 वर्षांमध्ये राजेश एक्सपोर्टसमध्ये देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी, म्युच्युअल फडांनी गुंतवणूक केली नाही. मात्र, एलआयसीची गुंतवणूक गेल्या 10 वर्षात पाच पट वाढली आहे. राजेश एक्सपोर्टसच्या वेबसाईटवरील डेटाचा आधार घेत इंडियन एक्स्प्रेसनं या संदर्भात वृत्त दिलं आहे.

राजेश मेहता राजेश एक्सपोर्टस या कंपनीचे प्रमोटर आहेत. या कंपनीत 2016 मध्ये म्युच्युअल फंडांची गुंतवणूक 0.5 टक्के होती. गेल्या 10 वर्षात ती पूर्णपणे काढून घेण्यात आली. खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी देखील राजेश एक्सपोर्टसपासून  दूर राहणं पसंत केलं. मात्र, सरकारी मालकीच्या एलआयसीनं मात्र गेल्या 10 वर्षात राजेश एक्स्पोर्टसमधील गुंतवणूक वाढवली. मार्च 2016 मध्ये एलआयसीची या कंपनीत गुंतवणूक 1.99 टक्के होती. मार्च 2022 पर्यंत ती 11.22 टक्क्यांवर पोहोचली होती.  31 मार्च 2026 पर्यंत 10.8 टक्क्यांवर पोहोचली आहे. एलआयसीकडून यासंदर्भात प्रतिसाद न आल्याचं देखील इंडियन एक्स्प्रेसनं म्हटलं आहे.

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची राजेश एक्स्पोर्टसमध्ये 2016 मध्ये गुंतवणूक 15.87 टक्के होती. ती 2023 मध्ये ती 17.7 टक्क्यांवर होती. मार्च  2026 पर्यंत ती कमी होऊन 14.2 टक्क्यांवर पोहोचली आहे.

सेबीनं त्यांच्या अंतरिम अहवालात राजेश एक्सपोर्टसनं त्यांचं उत्पन्न फुगवून मांडल्याचा आरोप केला आहे. राजेश एक्स्पोर्टसच्या शेअरमध्ये ट्रेडिंग करण्यास राजेश मेहताला मनाई करण्यात आली आहे.सेबीनं घातलेली बंधनं या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत कायम असतील. पुन्हा एकदा नव्यानं लेखापरिक्षण करण्याचे आदेश देखील सेबीकडून देण्यात आले आहेत.

राजेश एक्सपोर्टसची भूमिका

राजेश एक्स्पोर्टसनं सेबीनं केलेले आरोप फेटाळले आहेत. कंपनीकडून दाखवण्यात आलेलं उत्पन्न बरोबर असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. वाल्कैम्बीचं उत्पन्न मोजण्याऐवजी सेबीकडून EBIDTA  ग्राह्य धरला गेल्यानं संभ्रम निर्माण झाल्याचं राजेश एक्स्पोर्टसनं म्हटलं. तर, वाल्कैम्बी ही स्वित्झरलँडमधील सोन्याची रिफायनरी 2015  मध्ये 400 दशलक्ष अमेरिकन डॉलर्समध्ये खरेदी केली होती.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Comments are closed.