Ranji Trophy 2026/27 – पहिल्याच दिवशी मुंबईची सामन्यावर पकड; हिमाचलला 140 धावांत गुंडाळले; दिवसअखेर मुंबई 2 बाद 107
प्रतिस्पर्ध्याला स्वस्तात गुंडाळायचे आणि मग फलंदाजीने सामन्यावर वर्चस्व गाजवायचे, हीच मुंबईची खासियत. रणजी करंडकाच्या दुसऱया साखळी सामन्यात मुंबईने पहिल्याच दिवशी हिमाचल प्रदेशची फलंदाजी उद्ध्वस्त करत सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. हिमाचलला अवघ्या 140 धावांत गुंडाळल्यानंतर मुंबईने दिवसअखेर 2 बाद 107 धावांची मजल मारली. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ संपताना मुंबई विजयाच्या दिशेने दमदार पावले टाकताना दिसली. खेळ थांबला तेव्हा कर्णधार सिद्धेश लाड (32), तर मुशीर खान (34) खेळत होते.
मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीलाच हिमाचलला हादरवले. तुषार देशपांडेने सामन्यातील पहिल्याच चेंडूवर शुभम अरोराला पायचीत करत मुंबईच्या आक्रमणाची दणदणीत सुरुवात केली. त्यानंतर नेहल वढेरा यालाही त्याने पायचीत पकडले. देशपांडेने 46 धावांत चार विकेट घेतले, तर सिल्वेस्टर डिसोझाने दोन विकेट्स मिळवत हिमाचलची घसरण वेगवान केली. मोहित अवस्थी आणि तनुष कोटियन यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतला. हिमाचलचा कर्णधार पुकराज मान (35), वैभव कल्टा (33) आणि आकाश वशिष्ठ (39) यांनी प्रतिकार केला; पण त्यांची झुंज संघाला मोठय़ा धावसंख्येपर्यंत नेऊ शकली नाही. हिमाचलचा डाव 39.5 षटकांत 140 धावांवर संपला.
मुंबईच्या फलंदाजांनीही प्रतिस्पर्ध्याच्या गोलंदाजांना वरचढ होण्याची संधी दिली नाही, असे म्हणता येणार नाही. दिव्यांश सक्सेना 9 धावांवर, तर अंगकृष रघुवंशी 20 धावांवर बाद झाला. त्यामुळे मुंबईची दोन बाद 32 अशी अवस्था झाली होती. मात्र त्यानंतर कर्णधार सिद्धेश लाड आणि मुशीर खान यांनी जबाबदारी स्वीकारली. दोघांनी संयमाने फलंदाजी करत तिसर्या विकेटसाठी नाबाद 75 धावांची भागीदारी रचली. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मुंबईने 2 बाद 107 अशी दमदार मजल मारली होती.
दिवसअखेर मुंबईने 36 षटकांत दोन बाद 107 धावा केल्या असून पहिल्या डावातील आघाडीसाठी त्यांना आणखी 34 धावांची गरज आहे. आठ विकेट्स हातात असल्याने मुंबईची स्थिती भक्कम आहे. पहिल्याच दिवशी प्रतिस्पर्ध्याला रोखून फलंदाजीतही पकड मिळवणाऱ्या मुंबईने हिमाचलला मोठय़ा दबावाखाली ढकलले आहे. आता दुसऱ्या दिवशी आघाडी घेत ती किती वाढवते, याकडे लक्ष असेल.
रणजी फेरी
उत्तर प्रदेश विरुद्ध गोवा – रिंकू सिंहने नाबाद 118 धावांची झुंजार खेळी करत उत्तर प्रदेशला 202 धावांपर्यंत सावरले. प्रत्युत्तरात गोव्याने बिनबाद 43 धावा करत चांगली सुरुवात केली.
पंजाब विरुद्ध छत्तीसगड – शुभमन गिल अवघ्या एका धावेवर बाद झाला, मात्र कर्णधार उदय सहारनने नाबाद शतक झळकावत पंजाबचा डाव सावरला. दिवसअखेर पंजाबची धावसंख्या 4 बाद 269 होती.
दिल्ली विरुद्ध गुजरात – प्रियांश आर्यचे द्विशतक अवघ्या एका धावेने हुकले. त्याने 199 धावा केल्या. आयुष बदोनीने नाबाद 115 धावा झळकावल्याने दिल्लीने 4 बाद 381 अशी मोठी धावसंख्या उभारली.
महाराष्ट्र विरुद्ध झारखंड – विकी ओस्तवालच्या चार विकेटच्या जोरावर झारखंडचा डाव 169 धावांत आटोपला. प्रत्युत्तरात महाराष्ट्राने 3 बाद 85 धावा केल्या.
केरळ विरुद्ध ओडिशा – सचिन बेबीने 112 धावांची शतकी खेळी साकारली तर मोहम्मद अझरुद्दीनने नाबाद 72 धावा केल्या. केरळने दिवसअखेर 6 बाद 245 धावा केल्या.
सेनादल विरुद्ध बंगाल – पुलकित नारंगने पाच विकेट घेत बंगालचा डाव 184 धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात सेनादलाची दिवसअखेर 5 बाद 83 अशी अवस्था झाली.
बडोदा विरुद्ध बिहार – राज लिंबानीच्या चार विकेट्सनी बिहारचा डाव 166 धावांत संपवला. मग बडोद्याने 3 बाद 77 धावा केल्या.
जम्मू–काश्मीर विरुद्ध विदर्भ – गतविजेत्या जम्मू-कश्मीरचा डाव 260 धावांत आटोपला. कवलप्रीत सिंगचे शतक चार धावांनी हुकले. विदर्भाच्या नचिकेत भुतेने तीन विकेट घेतले.
तामीळनाडू विरुद्ध उत्तराखंड – उत्तराखंडचा डाव 134 धावांत गुंडाळताना तामीळनाडूच्या गुरजपनीत सिंग आणि साई किशोर यांनी प्रत्येकी चार विकेट घेत महत्त्वाची भूमिका बजावली. तामीळनाडूने 2 बाद 85 धावा केल्या.
राजस्थान विरुद्ध रेल्वे – सचिन यादवच्या नाबाद 115 आणि करण लांबाच्या नाबाद 89 धावांमुळे राजस्थानने 2 बाद 247 धावा केल्या. पावसामुळे दिवसाचा खेळ लवकर थांबला.
सिक्कीम विरुद्ध अरुणाचल प्रदेश – क्रांती कुमारने पाच विकेट घेत अरुणाचल प्रदेशचा डाव 121 धावांत गुंडाळला. सिक्कीमने प्रत्युत्तरात 1 बाद 126 धावा करत पहिल्या डावात आघाडी मिळवली.
आंध्र विरुद्ध हैदराबाद – हैदराबादने पहिल्या डावात 275 धावा उभारल्या. अभिरथ रेड्डीने 67 धावा केल्या, तर त्रिपुराना विजयने आंध्रकडून 4 विकेट घेतल्या.
आसाम विरुद्ध त्रिपुरा – आसामने सिबसंकर रॉयच्या 54 धावांच्या जोरावर 6 बाद 228 धावा केल्या. त्रिपुराच्या संदीप सरकारने तीन विकेट घेत आसामच्या धावसंख्येला लगाम घातला.
कर्नाटक विरुद्ध सौराष्ट्र – कर्नाटकने पहिल्या दिवसअखेर आठ बाद 281 धावा केल्या. मनवंत कुमारने 86 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत डावाला आधार दिला.
Comments are closed.