रणवीर सिंहला पाठवलेल्या धमकी प्रकरणात मोठी अपडेट; खंडणी मागणारा बिश्नोई टोळीचा सक्रिय सदस्य?

रणवीर सिंगला धमकीची केस बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगला (Ranveer Singh) पाठवलेल्या धमकीच्या व्हॉइस नोट प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासात नवी घडामोड झाली असून मुंबई क्राइम ब्रांचने लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीचा सक्रिय सदस्य हॅरी बॉक्सर (Harry Boxer) याच्यावर संशय व्यक्त केला आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, रणवीर सिंगच्या मॅनेजरला व्हॉट्सअ‍ॅपवर 1 कोटींची खंडणी मागणारी व्हॉइस नोट पाठवण्यात आली होती. प्राथमिक तपासात त्या व्हॉइस नोटमधील आवाज हॅरी बॉक्सरच्या आवाजाशी जुळत असल्याचे आढळले आहे. मात्र, याबाबत अधिक तांत्रिक व फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे.

Ranveer Singh Receives Threat Case : VPN द्वारे परदेशातून व्हॉइस नोट पाठवण्यात आल्याचा संशय

दरम्यान, रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर लगेचच ही धमकी आल्याचे सांगितले जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रणवीर सिंग यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तर क्राइम ब्रांचने तीन दिवसांपूर्वी रणवीर सिंगच्या मॅनेजरचा जबाब नोंदवला आहे. संबंधित व्हॉइस नोट VPN द्वारे परदेशातून पाठवण्यात आल्याचा संशय असून मूळ स्त्रोत शोधण्यासाठी इंटरपोलची मदत मागवण्यात आली आहे. दरम्यान, अभिनेता आयुष शर्मा यांच्या मॅनेजरलाही अशाच प्रकारची धमकी मिळाल्याने त्यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू असून अद्याप कोणतीही FIR दाखल करण्यात आलेली नाही.

Rohit Shetty : रणवीर सिंहला धमकी येण्यापूर्वी रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार

दरम्यान,  31 जानेवारी रोजी रात्री उशीरा सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या जुहू इथल्या घराबाहेर पाच राउंड फायर करण्यात आले. त्यावेळी रोहित शेट्टी घरातच होता. सुदैवानं या गोळीबारात कुणालाही दुखापत झालेली नाही. मुंबई पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात पुण्याहून 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या घटनेसंदर्भात अमन मारोटे (27), आदित्य गायकी (19), सिद्धार्थ येनपुरे (20), समर्थ पोमाजी (18) आणि स्वप्नील सकट (23) पाच जणांना अटक करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य शुभम लोणकर याला वॉन्टेड आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, रणवीर सिंह त्याच्या स्पाय थ्रिलर ‘धुरंधर’च्या जबरदस्त यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 1,300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आणि आदित्य धर दिग्दर्शित सिनेमानं भारतात 1,000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

आणखी वाचा

Comments are closed.