Ratnagiri News – दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून पडून संगमेश्वरच्या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
दिवा-रत्नागिरी पॅसेंजर रेल्वेतून प्रवास करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना महाड तालुक्यातील कावळे गावाच्या हद्दीत घडली. दीपक रहाटे असे मृत तरुणाचे नाव असून, ते मूळचे संगमेश्वर येथील रहिवासी होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दीपक रहाटे हे दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून प्रवास करत होते. रेल्वे कावळे गावाजवळ आली असता, जवळून दुसरी रेल्वे जात असताना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते धावत्या रेल्वेतून खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला अत्यंत गंभीर स्वरूपाची दुखापत झाली.
या दुर्घटनेची माहिती मिळताच महाड तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर महाशक्ती ॲम्बुलन्सचे अनिल चव्हाण यांच्या मदतीने त्यांना तात्काळ महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून दीपक रहाटे यांना मृत घोषित केले. रुग्णालयात शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या अपघाती निधनामुळे संगमेश्वर परिसरात सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.