Ratnagiri News – अडखळ-आंजर्ले खाडी गाळाने भरली; शासनाच्या अपयशामुळे मासेमारांची होणार दमछाक
दापोली तालुक्यातील अडखळ-आंजर्ले खाडीत सध्या मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. या खाडीतील गाळ काढण्यात यावा, अशी मागणी मासेमारांकडून शासनाकडे वर्षानुवर्षे केली जात आहे. मात्र, या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने, आता मासेमारी होड्या समुद्रात नेताना आणि समुद्रातून परत खाडीच्या किनाऱ्यावर आणताना मासेमारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मासेमारांची ही ज्वलंत समस्या सोडवण्याबाबत शासनकर्ते कमालीचे उदासीन असून, हे शासनाचे मोठे अपयश असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दापोली तालुक्यातील ‘हर्णे बंदर’ हे रत्नागिरी जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे मासेमारी बंदर म्हणून ओळखले जाते. या बंदरावरील मासेमारी होड्या सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या दुरुस्तीसाठी अडखळ आणि आंजर्ले खाडीच्या किनाऱ्याचा वापर केला जातो. मात्र, खाडीत येणारा मुख्य मार्गच आता गाळाने पूर्णपणे भरला आहे.
खाडीत साचलेल्या गाळामुळे अनेकदा मासेमारी होड्या चिखलात रुतून बसतात. गाळाची मोठी भाट (डिगारा) तयार झाल्यामुळे, भरती-ओहोटीच्या वेळी होड्या किनाऱ्यावर आणताना मासेमारांना जीवघेणी कसरत करावी लागते. शासनाच्या याच नाकर्तेपणामुळे येथील मच्छीमारांना आर्थिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
Comments are closed.