Ratnagiri News – गणपतीपुळे येथील समु्द्रात बुडालेल्यांपैकी चौघांचे मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

छत्रपती संभाजीनगर येथून आलेले पाच पर्यटक शनिवारी गणपतीपुळे समुद्रात बुडाले होते. त्यापैकी रविवारी तिघांचे मृतदेह सापडले. आतापर्यंत चौघांचे मृतदेह सापडले असून अद्याप बुडालेला एक पर्यटक बेपत्ता आहे. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस दल, मच्छिमार आणि तटरक्षक दलाची 24 तास शोध मोहीम सुरू आहे. या दुर्घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटनाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथून 19 पर्यटकांचा एक समूह गणपतीपुळे येथे शुक्रवारी 19 जून रोजी रात्रीच्या सुमारास दाखल झाला होता. हा समूह देवदर्शन व पर्यटनासाठी खाजगी वाहनाने आला होता. या पर्यटकांनी 19 जून रोजी रात्रीच्या सुमारास गणपतीपुळे येथे एका खाजगी लॉजिंगवर मुक्काम केला होता. शनिवारी सकाळी 10 वाजता पाच जण समुद्राच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरले उर्वरित 14 जण समुद्रकिनाऱ्यावर थांबले होते. मात्र, समुद्रात अंघोळीसाठी उतरलेले पाच जण पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्राच्या पाण्यात ओढले गेले आणि बुडाले.

समुद्रात बुडालेल्या पाच जणांमध्ये आदित्य संतोष राऊत (22), अनिकेत बंडू हिवराळे, आनंद राजू नरवडे, प्रेम दीपक आदमाने, यश रामेश्वर कांबळे यांचा समावेश होता. शनिवारी सायंकाळी प्रेम आदमाने याचा मृतदेह सापडला. उर्वरित चार जणांचा रात्रभर शोध सुरु होता. मध्यरात्री एक वाजता दुसरा मृतदेह सापडला. त्यानंतर रविवारी सकाळी आणखी दोन मृतदेह सापडले. बुडालेल्या पाच जणांपैकी प्रेम आदमाने, अनिकेत हिरवाळे, यश कांबळे आणि आनंद नरवडे यांचे मृतदेह सापडले आहेत. बेपत्ता असलेल्या आदित्य राऊतचा शोध सुरु आहे.

स्थानिक प्रशासन, पोलीस, जीवरक्षक तटरक्षक दल आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने बोटींच्या सहाय्याने बुडालेल्या बेपत्ता पर्यटकांचा 24 तास शोध घेण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे स्वतः आपल्या पोलीस अधिकाऱ्यांसह शोध मोहीमेत सहभागी झाले होते.

बुडालेल्या पर्यटकांचा रात्रभर शोध सुरू होता. समुद्रकिनाऱ्यावर अशा दुर्घटना वाढत आहेत. त्यामुळे लवकरच जीव रक्षक रोबोटिक वॉटर क्राफ्ट विकत घेण्याची प्रक्रिया राबवत आहोत, असे रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले.

Comments are closed.