Ratnagiri news – कॅनिंग कंपन्यांमध्ये अजूनही गुजरात-कर्नाटकच्या आंब्याची खरेदी, स्थानिक बागायतदारांचा आरोप
कॅनिंग कंपन्या स्थानिक बागायतदारांचा आंबा घेण्यासाठी टाळाटाळ करत असून कर्नाटक आणि गुजरातचा आंबा खरेदी करत असल्याचा आरोप स्थानिक आंबा बागायतदारांनी केला आहे. तसेच स्थानिक बागायतदारांना प्रति किलो 50 रुपये भाव द्यायलाही टाळाटाळ करत असल्याचा आरोप बागायतदारांनी केला आहे.
कॅनिंग कंपन्यांनी आंब्याचे दर पन्नास टक्क्यांनी कमी केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कॅनिंग कंपन्यांनी आंब्याला प्रतिकिलो 50 रुपये भाव देण्याचा सूचना करताना कर्नाटकातल्या आंब्यावर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर काही कॅनिंग कंपन्यांनी मंगळवारी प्रति किलो 50 रुपये दराने आंबा खरेदी केला मात्र त्यानंतर आज अनेक कॅनिंग कंपन्यांनी स्थानिक बागायतदारांचा आंबा खरेदी केलेला नाही. काही बागायतदारांनी उद्यापर्यंत कॅनिंग कंपन्या काय निर्णय घेतात याची वाट पहाण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी गुजरात आणि कर्नाटकचा आंबा खरेदी केला जात असल्याचाही आरोप बागायतदार करत आहेत.
Comments are closed.