Ratnagiri News – नोकरीच्या प्रतिक्षेत न राहता धरली स्वावलंबनाची वाट; अनिकेत किंजळकरचा लघुउध्योगाची तालुक्यात चर्चा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हातात कौशल्य, मनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर, रोजगारासाठी गाव सोडण्याची गरज नाही, याचं उत्तम उदाहरण संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील तरुण अनिकेत किंजळकर याने कृतीतून दाखवून दिले आहे. नोकरीच्या मागे न धावता त्याने द्रोण-पत्रावळी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला असून, मेहनतीच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभे राहत स्वावलंबनाची नवी वाट निवडली आहे.

आजच्या काळात अनेक तरुण सरकारी किंवा खासगी नोकरीच्या शोधात शहरांकडे धाव घेतात. मात्र अनिकेतने परिस्थितीला दोष देण्याऐवजी आपणच आपल्यासाठी रोजगार निर्माण करायचा’ असा निर्धार केला. याच विचारातून द्रोण-पत्रावळी बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला साधनसामग्री, बाजारपेठ आणि ग्राहक मिळवण्याची आव्हाने होती. मात्र जिद्द सोडली नाही. काम शिकत गेले, उत्पादनात गुणवत्ता आणली आणि हळूहळू ग्राहकांचा विश्वास संपादन केला. आज विविध धार्मिक कार्यक्रम, सण- समारंभ, लग्नकार्य आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी द्रोण-पत्रावळी उपलब्ध करून देण्याचे काम तो करत आहे.

द्रोण-पत्रावळी ही आपल्या ग्रामीण संस्कृतीशी जोडलेली पारंपरिक ओळख आहे. बदलत्या काळातही तिचे महत्त्व कायम आहे. प्लास्टिक आणि थर्माकोलला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक पत्रावळींची मागणी वाढत असताना अनिकेतने या संधीचा योग्य उपयोग केला आहे. कष्टाची लाज नाही आणि काम छोटे-मोठे नसते, हा विचार त्याच्या प्रवासातून अधोरेखित होतो. स्वतःच्या हाताने काम करून कुटुंबाला हातभार लावण्याबरोबरच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याची क्षमता त्याने दाखवून दिली आहे.

ग्रामीण भागातील तरुणांनी केवळ नोकरीच्या संधींची वाट न पाहता आपल्या परिसरातील गरज, उपलब्ध साधने आणि स्वतःचे कौशल्य ओळखून छोट्या उद्योगांची सुरुवात करावी, असा प्रेरणादायी संदेश अनिकेतच्या वाटचालीतून मिळतो. गोळवलीच्या मातीतून द्रोण-पत्रावळींच्या माध्यमातून स्वावलंबनाची नवी कहाणी लिहिणारा अनिकेत किंजळकर आज अनेक तरुणांसाठी ‘नोकरी मागणारा नव्हे, तर रोजगार निर्माण करणारा तरुण’ म्हणून प्रेरणादायी ठरत आहे.

Comments are closed.