Ratnagiri News – मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांनी घाई करू नये, तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
यंदा मान्सूनचे आगमन उशिराने होत असल्याने शेतकऱ्यांनी कोणतीही घाईगडबड न करता हवामानाचा अंदाज आणि पावसाची स्थिती लक्षात घेऊनच खरीप हंगामातील कामांचे नियोजन करावे, असे आवाहन दापोली तालुका कृषी अधिकारी हेमंत डांगे यांनी केले आहे. अपुऱ्या पावसामुळे पेरणी अथवा भात नर्सरीची घाई केल्यास नुकसान होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुरेसा पाऊस पडून जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झाल्याशिवाय भात नर्सरी किंवा पेरणीची कामे सुरू करू नयेत. किमान ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे कृषी तज्ज्ञांनी सुचविले आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधीच पेरणी केली आहे आणि पाण्याची उपलब्धता आहे, त्यांनी पिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी हलके पाणी देणे किंवा आच्छादनाचा वापर करावा.
पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही कृषी विभागाने केले आहे. उपलब्ध पाण्याचा वापर केवळ अत्यावश्यक शेती कामांसाठी करावा तसेच शेतातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा आणि आच्छादनाचा वापर वाढवावा, असे सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी बियाणे आणि खतांची खरेदी करताना केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. खरेदी केलेल्या बियाण्यांचे पक्के बिल आणि टॅग जतन करून ठेवावेत. पावसातील अनिश्चितता लक्षात घेता कमी कालावधीत येणाऱ्या तसेच कमी पावसात तग धरणाऱ्या भात जातींची निवड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या भात वाणांना प्राधान्य देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
मान्सून आणखी लांबल्यास पर्यायी पिकांचे नियोजन तयार ठेवावे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. हवामानातील बदलांनुसार कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी अफवा किंवा अप्रमाणित माहितींवर विश्वास न ठेवता हवामान विभागाचे अधिकृत अंदाज आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसारच निर्णय घ्यावेत. अधिक माहितीसाठी संबंधित गावातील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी हेमंत डांगे यांनी केले आहे.
Comments are closed.