Ratnagiri News – संगमेश्वरमधील नवीन सोनवी पुलावर भीषण अपघात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रचंड घाईगडबडीत वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या नवीन सोनवी पुलाला महिना पूर्ण होण्याआधीच मंगळवारी सकाळी भीषण अपघात घडला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर ट्रक आणि कंटेनर पुलावर समोरासमोर धडकली. पूल सुरू होऊन महिनाही झाला नसताना घडलेल्या या अपघातामुळे संबंधित ठेकेदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ढिसाळ व जीवघेण्या नियोजनावर स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मंगळवारी सकाळी अचानक पुलाच्या दिशेने एक मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून जवळच असलेल्या एसटी स्टँड परिसरातील प्रवासी, चालक-वाहक आणि स्थानिक ग्रामस्थांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. मुंबईच्या बाजूचा पूल पूर्ण न झाल्यामुळे, आता याच गोवा मार्गिकेवरून मुंबई आणि गोवा अशा दोन्ही बाजूंनी येणारी-जाणारी सुसाट वाहने सोडली जात आहेत. त्यातच हा पूल तीव्र वळणाचा असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा चालकांना अंदाज येत नाही.

एकाच मार्गिकेतून परस्परविरोधी दिशांना जाणारी अवजड वाहने अंध वळणावर समोरासमोर आल्यानेच हा अपघात घडला आहे. वळणाच्या रस्त्यावर आवश्यक ते गतिरोधक, दिशादर्शक फलक किंवा वाहनांचा वेग नियंत्रित करणारी कोणतीही यंत्रणा न बसवता दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच मार्गिकेतून सुरू करणे म्हणजे वाहनचालकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे.

अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहने पुलाच्या मध्यभागीच अडकल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत अपघातग्रस्त वाहने बाजूला सारली आणि वाहतूक कोंडी सुरळीत केली.

या अपघातात सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली, तरी वाहनांचे चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले आहेत. यामध्ये झेवियर अल्वेरीस (31), शहीद पानाडी (23) आणि सुरेश बांगर (32) अशी जखमींची नावे आहेत. या सर्वांना तातडीने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर आवश्यक ते प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी त्यांना सोडून दिले. दरम्यान, अपघात घडल्यानंतर संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि वाहतूक कोंडी दूर केली.

Comments are closed.