Ratnagiri News – देवरुखात मध्यरात्री थरार, घरात शिरलेला 5.5 फुटांचा अजगर पकडला; ‘हेल्प फोर्स’च्या रक्षकांची समयसूचकता
देवरुख येथील रहिवासी योगेश गुरव यांच्या घरी शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास एका विशाल अजगराच्या दर्शनाने घरातील सदस्यांची चांगलीच भितीने गाळण उडाली. सुमारे ५.५ फूट लांबीचा हा अजगर अचानक घरात शिरल्याचे निदर्शनास येताच परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने स्थानिक ‘हेल्प फोर्स’ टीमशी संपर्क साधण्यात आला. माहिती मिळताच मध्यरात्रीच्या सुमारास हेल्प फोर्सचे रक्षक आर्य बेर्डे, प्रमोद पुसाळकर आणि दुर्वांकुर बेर्डे यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली.
मध्यरात्रीची वेळ आणि अजगराचा मोठा आकार यामुळे बचाव कार्यात मोठे आव्हान होते. परंतु, हेल्प फोर्सच्या या तिन्ही रक्षकांनी अत्यंत धैर्याने, कौशल्याने आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत अवघ्या काही वेळात या ५.५ फुटांच्या अजगराला सुखरूप पकडले (रेस्क्यू केले). अजगराला सुरक्षित रीतीने ताब्यात घेतल्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले आहे. मध्यरात्रीच्या वेळी दाखवलेल्या या धाडसाबद्दल आणि तत्परतेबद्दल योगेश गुरव यांच्या कुटुंबासह सर्व देवरुखवासीयांकडून ‘हेल्प फोर्स’च्या रक्षकांचे कौतुक व आभार मानले जात आहेत
Comments are closed.