Ratnagiri News – चिपळूणमध्ये स्मार्ट मीटरविरोधात शिवसेनेचा एल्गार, 10 हजार हरकत अर्जांनंतर महावितरण नमले

चिपळूण शहर व तालुक्यात महावितरणकडून सक्तीने राबवल्या जाणाऱ्या स्मार्ट मीटर योजनेच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज तीव्र आंदोलन छेडले. शहरप्रमुख सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या धडक मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी महावितरणकडे स्मार्ट मीटरला विरोध दर्शविणारे सुमारे १० हजार स्वाक्षरीयुक्त हरकत अर्ज सुपूर्द करण्यात आले. या जनदबावामुळे अखेर महावितरण प्रशासनाला नमते घ्यावे लागले असून, पुढील आठ दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होईपर्यंत स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

महावितरणच्या येथील पॉवर हाऊस कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात युवासेना, महिला आघाडी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मोर्चा कार्यालयात पोहोचल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता भामरे, उपकार्यकारी अभियंता डोंगरे आणि राऊत यांच्याशी सखोल चर्चा केली. पोस्टपेड व्यवस्था बदलून स्मार्ट मीटरची सक्ती का केली जात आहे, नागरिकांच्या संमतीशिवाय मीटर बदलण्याचा अधिकार कोणाला दिला आणि कंत्राटदारांच्या हितासाठी सर्वसामान्यांना वेठीस का धरले जात आहे, असे संतप्त सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केले. अनेक भागांत वीजबिलात वाढ झाल्याच्या तक्रारीही यावेळी मांडण्यात आल्या.

चर्चेदरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत वरिष्ठ पातळीवर योग्य निर्णय होत नाही, तोपर्यंत सक्तीची मोहीम थांबवण्याची मागणी लावून धरली. तसेच ज्या नागरिकांनी लेखी हरकत नोंदवली आहे, त्यांचे मीटर बदलू नयेत आणि प्रत्येक अर्जाची अधिकृत नोंद करून ग्राहकांना पोच द्यावी, अशी आग्रही भूमिका घेतली. जनभावनेचा अनादर केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक स्तरावरील मर्यादा स्पष्ट करत, पुढील आठ दिवसांत महावितरणचे मुख्य अभियंता यांच्यासोबत चिपळूणमध्ये बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. जोपर्यंत ही बैठक होत नाही, तोपर्यंत चिपळूण शहरात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम बंद राहील, अशी ग्वाही कार्यकारी अभियंता भामरे यांनी दिली. या आंदोलनात महादेव कदम, राजू देवळेकर, सचिन चोरगे, प्रितम वंजारे, पार्थ जागुष्टे, अशोकराव नलावडे, शशिकांत चव्हाण, ऐश्वर्या घोसाळकर, वैशाली शिंदे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.