बुटात प्रश्नपत्रिका, प्रश्नपत्रिकेचा 8 हजारांना सौदा अन् 6 लाख शिक्षक उमेदवारांचे भविष्य धोक्या

TET परीक्षेचा पेपर फुटला: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET-2026) पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांनी (Bhiwandi Police) केलेल्या तपासातून धक्क्यावर धक्का देणारी माहिती समोर येत आहे. तब्बल सहा लाखांहून अधिक शिक्षक उमेदवारांचे भविष्य ठरवणारी प्रश्नपत्रिका कोणत्याही हॅकिंगने किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नव्हे, तर एका साध्या बुटाच्या मदतीने छापखान्यातून बाहेर काढण्यात आली. त्यासाठी मोबदला किती मिळाला, तर अवघे 8 हजार रुपये आणि भविष्यात एक प्लॉट देण्याचे आश्वासन. (TET Exam Paper Leak)

TET-2026 परीक्षेसाठी राज्यभरातील सुमारे सहा लाख उमेदवार आणि 1,028 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता राखण्यासाठी परीक्षा परिषदेने राज्याबाहेरील आग्रा येथील अत्यंत गोपनीय ‘महीम पत्रन प्रायव्हेट लिमिटेड’ या छापखान्यात छपाईची जबाबदारी दिली होती. छापखान्याभोवती कडेकोट सुरक्षा, माजी सैनिकांचा पहारा आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची अंगझडती घेतली जात होती. मात्र, सुरक्षेतील एक छोटीशी चूक संपूर्ण व्यवस्थेवर भारी पडली.

TET Exam Paper Leak: बुटाच्या इनसोलमध्ये लपवून बाहेर काढले चारही सेट

15 ते 17 जूनदरम्यान छपाई सुरू असताना प्रेसमधील कर्मचारी नरेशकुमार पुरनचंद माहौर उर्फ निक्की याने प्रश्नपत्रिकेची पाने घडी करून ती बुटाच्या इनसोलखाली लपवली. सुरक्षा रक्षकांनी शरीराची तपासणी केली, पण बुटांची नाही. याचाच फायदा घेत त्याने सलग तीन दिवस पेपर-1 आणि पेपर-2 चे चारही संच छापखान्याबाहेर काढले. त्यामुळे परीक्षेच्या दिवशी कोणताही संच निवडण्याची परीक्षा परिषदेची योजना पूर्णपणे फसली.

TET Exam Paper Leak: 8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला

छापखान्यातून अवघ्या 8 हजार रुपयांत बाहेर पडलेली प्रश्नपत्रिका मुख्य सूत्रधार बीजेंद्र कुमार गुप्ता याने आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून तब्बल 80 हजार रुपयांना विकल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर विविध एजंटांनी त्यावर स्वतःचे कमिशन जोडत किंमत आणखी वाढवली. विशेष म्हणजे, ही प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली नव्हती. संपूर्ण व्यवहार हार्ड कॉपीच्या माध्यमातून करण्यात आला.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, फरार असलेला मुख्य सूत्रधार बीजेंद्र कुमार गुप्ता हा एखाद्या विशिष्ट परीक्षेला लक्ष्य करत नव्हता. त्याऐवजी विविध राज्यांच्या प्रश्नपत्रिका जिथे छापल्या जातात, त्या गुप्त छापखान्यांतील कर्मचाऱ्यांना पैशांचे आणि इतर आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढत होता. छपाईसाठी कोणतीही प्रश्नपत्रिका आली की ती बाहेर काढून आपल्या कोचिंग नेटवर्कमार्फत विकण्याचा त्याचा पॅटर्न होता.

तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली. ज्या छापखान्यात राज्यातील सर्वात गोपनीय प्रश्नपत्रिका छापल्या जात होत्या, तेथील सीसीटीव्ही कॅमेरेच बंद होते. त्यामुळे आरोपींची कोणतीही हालचाल रेकॉर्ड झाली नाही.

TET Exam Paper Leak: भिवंडीतून मिळाली पहिली टिप अन् उलगडला संपूर्ण कट

28 जून रोजी होणाऱ्या TET परीक्षेच्या दोन दिवस आधी म्हणजे 26 जून रोजी भिवंडी पोलिसांना पेपरफुटीची गोपनीय माहिती मिळाली. पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली डमी ग्राहक पाठवून सापळा रचण्यात आला. शिक्षण विभागाकडून प्रश्नपत्रिका मूळ असल्याची खात्री होताच कारवाई करण्यात आली. त्यानंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले. बिहार, हरियाणा, दिल्ली आणि आग्रा येथे कारवाया करत या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला.

TET Exam Paper Leak: आतापर्यंत 12 आरोपी जेरबंद

२८ जून: धीरज बलराज सिंग (हरियाणा)
राजीव शॉ (बिहार)
आकाश कुमार सरोज कुमार (बिहार)

29 जून: सुमन कुमारी (विजेंद्र गुप्ता यांची पत्नी, पाटणा)

२ जुलै : सोनूकुमार सिंग
मिथुन कुमार सिंग (दोघे समस्तीपूर, बिहार)
कपिल कृष्ण दहिया (सोनीपत, हरियाणा)

४ जुलै : संजयकुमार सुरेशचंद्र शर्मा
बाबूलाल नारायण सिंह कुशवाह
नरेशकुमार पुरनचंद माहौर उर्फ निक्की (तिघेही आग्रा)

९ जुलै : नरेशकुमार पवनकुमार अशोककुमार यादव (नवी दिल्ली)
हरिओम रिचपाल सिंग पनू (हिसार, हरियाणा)

या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार बीजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याचा साथीदार सोनू अद्याप फरार आहे.

TET परीक्षा पेपर लीक: उच्चस्तरीय समिती स्थापन

दरम्यान, या धक्कादायक प्रकरणानंतर राज्य सरकारने परीक्षा व्यवस्थेचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. भविष्यात कॉम्प्युटर आधारित परीक्षा (CBT), डिजिटल पद्धतीने प्रश्नपत्रिका वितरण आणि अधिक सक्षम सुरक्षा यंत्रणा लागू करण्याच्या पर्यायांवर सरकार गंभीरपणे विचार करत आहे. अवघ्या 8 हजार रुपयांसाठी सहा लाख शिक्षक उमेदवारांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या पेपरफुटीने राज्यातील परीक्षा व्यवस्थेतील सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, भिवंडी पोलिसांच्या तपासामुळे या देशव्यापी रॅकेटचा चेहरा अखेर उघड झाला आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Mumbai Crime News: शौचालयात दिसला नवजात बाळाचा हात… पुढचं दृश्य पाहून सर्वच हादरले; मुंबईच्या कूपर रुग्णालयातील धक्कादायक घटना

शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा

Comments are closed.