अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; 40 सिमकार्ड बदलून मोठा खेळ खेळला

नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली (Airoli) आणि दिघा परिसरात गेल्या वर्षी घडलेल्या एका अत्यंत थरारक आणि क्रूर हत्याकांडाचा रबाळे एमआयडीसी पोलिसांनी (Rabale MIDC Police) तब्बल 11महिन्यांनंतर धक्कादायक उलगडा केला आहे. आपल्या अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. केवळ हत्याच नाही, तर पुरावा नष्ट करण्यासाठी पतीच्या मृतदेहाचे तीन तुकडे करून ते जंगलात पुरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.

Airoli Love Affair Case : रिक्षावाल्याच्या प्रेमात पडली पत्नी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघा परिसरात राहणारी विवाहित महिला सुनीता कुशवाह हिचे राहुल प्रजापती या रिक्षाचालकाशी प्रेमसंबंध जुळले होते. या अनैतिक संबंधांची माहिती पती बळीराम कुशवाह (Baliram Kushwaha) यांना मिळताच घरात वाद सुरू झाले. आपल्या प्रेमात पती अडथळा ठरत असल्याने सुनीता आणि राहुल यांनी बळीराम यांचा काटा काढण्याचे ठरवले.

8 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री सुनीताने आपल्या दोन्ही मुलांना बहिणीकडे पाठवले. पती बळीराम हे गाढ झोपेत असताना तिने प्रियकर राहुल प्रजापती याला घरी बोलावून घेतले. दोघांनी मिळून बळीराम यांचा गळा चिरून अत्यंत क्रूरपणे खून केला.

प्रेमप्रकरण Fake Story : पती सत्संगला गेलेत… 11 महिने रचला बनाव

हत्येनंतर सुनीताने सासरच्या आणि आजूबाजूच्या लोकांची दिशाभूल करण्यासाठी पती बळीराम हे ‘सत्संग’ला (Satsang) गेले असून तिथेच थांबले आहेत, असा खोटा बनाव रचला. पती तब्बल 11 महिने गायब असतानाही पत्नी सुनीताने पोलीस ठाण्यात कोणतीही मिसिंग (Missing Complaint) तक्रार नोंदवली नाही.

अखेर, 11 महिन्यांनंतर उत्तर प्रदेशवरून (UP) मयत बळीराम यांच्या भावाने नवी मुंबईत येऊन रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पत्नीच्या वागण्यातील संशयास्पद बाबी आणि तिने तक्रार न दिल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी तपास सुरू केला.

Navi Mumbai Airoli Murder Case  : मृतदेहाचे तीन तुकडे करून जंगलात पुरले

गुन्हे शाखेने आणि रबाळे पोलिसांनी जेव्हा सुनीताची कसून चौकशी सुरू केली, तेव्हा एकापाठोपाठ एक अत्यंत धक्कादायक खुलासे समोर आले. हत्येनंतर आरोपी सुनीता कुशवाह आणि राहुल प्रजापती यांनी बळीराम यांच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले. हे तुकडे त्यांनी घणसोली एमआयडीसी (Ghansoli MIDC) परिसरातील डोंगराळ जंगलात नेऊन पुरले. पोलिसांनी घटनास्थळावरून शरीराचे अवशेष ताब्यात घेतले असून ते डीएनए (DNA Test) चाचणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत.

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आणि प्रियकराशी संपर्कात राहण्यासाठी सुनीताने तब्बल 40 वेगवेगळी सिमकार्ड (SIM Cards) बदलल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाले. पतीची हत्या केल्यानंतर सुनीताने दिघा येथील राहते घर सोडले आणि आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन ती प्रियकर राहुल प्रजापती याच्यासोबत दुसऱ्या ठिकाणी राहू लागली होती.

पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि कसून केलेल्या चौकशीच्या जोरावर दोन्ही आरोपींना अटक केली असून, दोन्ही नराधमांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास पोलीस करत आहेत.

ही बातमी वाचा:

Comments are closed.