Ratnagiri News – कोकणाची राखरांगोळी करणारे प्रकल्प नकोत – ऋषिकेश गुजर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कोकणामध्ये यापूर्वी राजापूर व रत्नागिरी येथे अणुऊर्जा प्रकल्प होणार होते. तेथे जनतेने विरोध केल्यावर हे प्रकल्प हटवण्यात आले आहेत. आता पुन्हा हेच प्रकल्प दापोलीच्या माथी मारण्याचे काम भाजपाचे सरकार करत असून, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी केलेल्या कोकण दौऱ्यावेळी कोकणची राख रांगोळी करणारे प्रकल्प नकोत ही भूमिका स्पष्टपणे मांडली होती.

कोकणच्या वाटेला राख व गुजरातमध्ये रांगोळी असे प्रकल्प कोकणात येणार असतील तर आम्ही स्थानिक भूमीपुत्र म्हणून या प्रकल्पांना ठाम विरोध करणार आहोत. हा प्रकल्प या परिसरात येणार याची माहिती काही दिवसापूर्वीच काही लोकप्रतिनिधींना समजली होती. व त्यानुसार स्थानिक एजंटाद्वारे येथे मोठ्या प्रमाणात जमिन खरेदी झाल्याचे समजत आहे. हा प्रकल्प काही जणांच्या फायद्यासाठी होणार आहे असा संपूर्ण घाट दिसत आहे. भिवबंदर जवळच रत्नागिरी पॉवर प्रोजेक्ट असून तो पूर्ण क्षमतेने चालवण्याच्या ऐवजी नवा प्रकल्प आणणे चुकीचे आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी म्हटले आहे.

दाभोळ खाडीमध्ये व जवळपासच्या समुद्रामध्ये लोटे येथील सांडपाण्यामुळे मासेमारीचा प्रश्न निर्माण झाला असून आता या प्रकल्पामुळे पुन्हा समुद्रात मासेमारीचा प्रश्न निर्माण होणार आहे. दापोलीचे अर्थकारण हे पर्यटन व मासेमारी या मुख्य व्यवसायांवर आधारित आहे. या व्यवसायामध्ये प्रकल्पाइतकीच नोकरी देण्याची संधी असताना त्याकडे दुर्लक्ष करून विनाशकारी प्रकल्प दापोलीच्या माथी मारण्यात आला आहे. आपण याबाबत पक्षातील वरिष्ठांना प्रकल्पाबाबत माहिती दिली असून पर्यावरण तज्ज्ञांजवळ चर्चा करून दापोलीतील सुजाण नागरिकांची एकफळी निर्माण करून या प्रकल्पाला सर्वतोपरी विरोध करणार आहोत.

या प्रकल्पाव्दारे आठ ते दहा हजार नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले गेले असले तरी प्रकल्पाला आवश्यक तांत्रिक ज्ञान हे स्थानिक लोकांकडे नाही. त्यामुळे स्थानिक केवळ सुरक्षारक्षक व शिपाई म्हणूनच भरती होतील. त्यामुळे अशा प्रकल्पांचा कोणताही उपयोग कोकणाला नाही, असेही पुढे ऋषिकेश गुजर यांनी नमूद केले.

Comments are closed.