Ratnagiri News – आंजर्ले कड्यावरील गणपती मंदिरात धाडसी चोरी; दानपेटी फोडून 90 हजारांची रोकड लंपास

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भक्ती आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या दापोली तालुक्यातील प्रसिद्ध ‘आंजर्ले कड्यावरील गणपती’ मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची खळबळजनक घटना 14 एप्रिल रोजी घडली. मंदिराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केलेल्या चार चोरट्यांनी गाभाऱ्यातील स्टीलची दानपेटी पळवून नेली. मंदिराच्या आवाराबाहेर असलेल्या बुरुजाखाली ही पेटी फोडून त्यातील सुमारे 90 हजार रुपयांची रोकड आणि लॉकर घेऊन चोरटे पसार झाले. या घटनेमुळे आंजर्ले परिसरात संतापाची लाट असून देवस्थानच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ही संपूर्ण चोरीची घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 14 एप्रिल रोजी पहाटे 2.20 च्या सुमारास चार अनोळखी व्यक्तींनी तोंडाला मास्क आणि डोक्याला कानटोपी लावून मंदिरात प्रवेश केला. निळ्या रंगाचे जॅकेट आणि काळ्या पॅंटमधील या चोरट्यांनी पहारीसारख्या हत्याराने कुलूप तोडले. विशेष म्हणजे, दापोली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांचे सत्र सुरू आहे. पाच दिवसांपूर्वीच गव्हे पवार वाडी येथे 13 लाखांची चोरी झाली असतानाच, आता सीसीटीव्ही यंत्रणा असलेल्या मंदिरात चोरी झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

याप्रकरणी विजय गणेश निजसुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दापोली पोलीस ठाण्यात भा.न्या.क. 331 (4), 305(अ), 324(4) आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली आहेत. “आरोपींनी मास्क लावले असले तरी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्यांचा शोध घेतला जात असून, लवकरच त्यांना जेरबंद करण्यात येईल,” असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

Comments are closed.