Ratnagiri News – चांदोर गावातील ग्रामस्थांना तीन महिने रेशनवर धान्यच मिळाले नाही; शेकडो महिला जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात धडकल्या

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरी तालुक्यातील चांदोर गावातील ग्रामस्थांना तब्बल तीन महिने रेशनवर धान्य मिळाले नाही. वारंवार तक्रारी केल्यानंतर मंगळवारी रत्नागिरी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी चांदोर गावातील शेकडो महिला जिल्हा पुरवठा कार्यालयात धडकल्या आणि त्यांनी रेशनवर धान्य मिळत नसल्याची व्यथा मांडली.

चांदोर येथील ग्रामस्थांना रेशन दुकानावर धान्य मिळत नसल्याच्या वारंवार तक्रारी आल्यानंतर २७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांनी रेशनदुकानात जाऊन तपासणी केली असता रेशन दुकानात गंभीर दोष आढळून आले. अन्नधान्य वितरणात तफावत आढळून आली. त्यामुळे मंगळवारी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात सुनावणी आयोजित करण्यात आली होती. रेशनदुकानदार संदीप तोडणकर विरूद्ध सरपंच पूनम मेस्त्री, उपसरपंच सुर्यकांत तांबे,संजीवनी घडशी पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि इतर ग्रामपंचायत सदस्यांना बोलाविण्यात आले होते. यावेळी चांदोर गावातील शेकडो महिला रेशन कार्ड घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयावर धडकल्या.

बायोमॅट्रीक थम्ब घेऊनही धान्य नाही
चांदोर गावातील काही ग्रामस्थांचे बायोमॅट्रीक थम्ब घेऊन त्यांना धान्य मिळाले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी सांगितले की, यापुढे धान्य मिळणार असेल तरच तुम्ही बायोमेट्रीक थम्ब द्या. तुम्ही थम्प दिलात की तुम्ही धान्य घेतले असा अर्थ होतो. कुणाला तीन महिने धान्य मिळाले नाही, कुणाला दोन महिने मिळाले नाही याची नोंद आम्ही आज घेतोय. या प्रकरणाची आम्ही चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. दरम्यान, सुनावणीला रेशन दुकानदार अनुपस्थित होता.सरपंच पूनम मेस्त्री आणि उपसरपंच सुर्यकांत तांबे यांनी ग्रामस्थांच्या वतीने नेतृत्व केले.

धान्य येते मग जाते कुठे?
आम्हाला तीन महिने रेशनवर धान्य मिळाले नाही.रेशनवर धान्य येते पण एका दिवसात संपते अशी व्यथा काही महिलांनी मांडली.

Comments are closed.