Ratnagiri News – भरणे-खेड मार्गावर भरधाव डंपरची रिक्षाला धडक, अपघातात तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

खेड तालुक्यातील भरणे-खेड मार्गावर भरधाव डंपरने रिक्षाला पाठीमागून धडक दिली. या अपघातात रिक्षातील प्रवासी तरुणाचा मृत्यू झाला असून, रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. नवीन गंगाराम कदम (42) असे मयत तरुणाचे नाव असून तो खेड तालुक्यातील नांदिवली केळेवाडी येथील रहिवासी आहे. ही घटना शनिवारी 30 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी रिक्षाचालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील भिलारे आयनी येथील संतोष भिलारे हा त्यांच्या ताब्यातील रिक्षा घेऊन भरणे येथून खेडच्या दिशेने जात होते. दरम्यान आठवडा बाजार परिसरात पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की रिक्षाच्या मागील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात रिक्षाचालक संतोष भिलारे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातात नवीन कदम याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुलगी असा परिवार आहे. नवीन कदम हे व्यवसायाने शिंपी होते. परंतु भूगर्भातील पाणी दाखवण्याचे त्यांच्यात कौशल्य असल्याने संपूर्ण कोकणातून विविध ठिकाणावरून त्यांना ग्रामस्थ विहीर किंवा कूपनलिका खोदण्यापूर्वी बोलवत असत. त्यामुळे अनेकांशी त्यांचा परिचय होता. कदम यांचे अचानक अपघाती निधन झाल्याने शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Comments are closed.