वर्ल्ड कपचे स्वरुप बदलल्यानंतर अश्विनचा आयसीसीला सल्ला! म्हणाला, “द्विपक्षीय मालिकेत तिसरा संघ….”
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी (15 जुलै) पुरुष संघांच्या प्रमुख स्पर्धांचे बदलते स्वरूप जाहीर केले. त्यानंतर अनेकांनी आपापली मते व्यक्त केली आहे. भारताचा महान फिरकीपटू आर अश्विन यानेही गुरूवारी (16 जुलै) त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून आपले विचार व्यक्त केले आहेत.
एकदिवसीय आणि टी 20 विश्वचषक फॉरमॅटमध्ये अधिक संघांचा समावेश करण्यासाठी केलेले संरचनात्मक बदल समजण्यासारखे आहेत, मात्र खेळाला खऱ्या अर्थाने जागतिक बनवण्यासाठी आयसीसीला प्रत्येक द्विपक्षीय मालिकेत सहयोगी राष्ट्रांच्या संघांचाही समावेश करावा लागेल.
आयसीसीने 2027 मध्ये खेळला जाणारा एकदिवसीय विश्वचषक आणि 2028 चा टी 20 विश्वचषक फॉरमॅटमधील बदल सांगितला आहे. 2027 मध्ये खेळला जाणारा एकदिवसीय विश्वचषक तीन टप्प्यांत तर टी 20 विश्वचषक सुपर 8 च्या टप्प्यात आता 10 संघांचा समावेश असेल.
“2027 एकदिवसीय विश्वचषक आणि 2028 टी-20 विश्वचषकासाठी आयसीसीने वेळापत्रकात केलेले बदल स्पर्धात्मकतेच्या दृष्टिकोनातून योग्य वाटतात,” असे अश्विनने एक्सवर पोस्ट केले आहे.
“परंतु जर खेळाचा विकास करणे हे अंतिम ध्येय असेल, तर उदयोन्मुख राष्ट्रांसाठी एक अधिक मजबूत मार्ग असणे आवश्यक आहे,” असेही अश्विनने पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे.
“नेदरलँड्स, स्कॉटलंड, नेपाळ, अमेरिका आणि आयर्लंड यांसारख्या संघांना केवळ पात्रता स्पर्धांची नव्हे, तर अधिक अर्थपूर्ण सामन्यांची गरज आहे (उदाहरणार्थ: प्रत्येक द्विपक्षीय मालिकेत तिसरा संघ म्हणून त्यांचा समावेश होणे), ” असे अश्विनने सुचविले आहे.
अश्विनच्या मते, सांघिक विकासामुळेच हा खेळ ऑलिम्पिकमध्ये एक भव्य प्रदर्शन बनेल.
टी 20 विश्वचषक 20 संघांचाच असेल, 2028 मध्ये याचे आयोजन ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संयुक्तपणे करणार आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात संघांची संख्या वाढवण्यासाठी स्पर्धेचे सुधारित स्वरूप तयार करण्यात आले आहे.
गट फेरी (30 सामने) – 2026 च्या आवृत्तीत प्रत्येकी पाच संघांचे चार गटामध्ये विभागणी केली होती. आता 20 सहभागी संघांना प्रत्येकी चार संघांच्या पाच गटांमध्ये विभागले जाईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर 10 मध्ये पोहोचतील.
सुपर 10 (20 सामने) – या फेरीत पाच संघाचे दोन गट असतील. त्यांच्यात राऊंड-रॉबिन पद्धतीने सामने खेळले जातील. प्रत्येक सुपर 10 गटातील विजेते थेट उपांत्य फेरीत पोहोचतील.
एलिमिनेटर्स (2 सामने) – उर्वरित दोन उपांत्य फेरीतील जागेसाठी एका नव्या एलिमिनेटर्स फेरीद्वारे संघ निश्चित होईल. यामध्ये प्रत्येक सुपर 10 गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघ विरुद्ध तिसऱ्या क्रमांकावरील संघाशी सामना करतील.
एलिमिनेटरमधील विजेते उपांत्य फेरीत पोहोचतील. त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामना सध्याच्या स्वरूपानुसारच होईल.
आयसीसी पुरुष क्रिकेट वनडे विश्वचषक 2027 चे आयोजन दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे संयुक्तपणे करणार आहेत. या स्पर्धेत पूर्वीप्रमाणे 14 संघ सहभागी होतील. याच्या अंतिम टप्प्यांपर्यंत पोहोचण्यासाठी स्पर्धेचे स्वरूप तीन टप्प्यांचे नवीन असेल.
स्पर्धेचे स्वरूप-
फेरी 1 – पात्र ठरलेल्या 14 पैकी तळाच्या तीन संघांमध्ये (12, 13 आणि 14 व्या क्रमांकाचे) राऊंड-रॉबिन सुपर सिरीज खेळली जाईल. यामध्ये जो जिंकेल तो पुढील फेरीत प्रवेश करेल.
फेरी 2 – त्यानंतर उर्वरित 12 संघांना प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांमध्ये विभागले जाईल. त्यानंतर प्रत्येक गट राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळेल. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ तसेच दोन गटांमधील पुढील सर्वोत्तम स्थानावरील संघ ‘सुपर 7’ टप्प्यासाठी पात्र ठरेल.
फेरी 3, सुपर 7 – या फेरीत सात संघांसाठी राऊंड-रॉबिन स्वरूप असेल, ज्यातील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
उपांत्य फेरी – पहिल्या क्रमांकावरील संघ चौथ्या क्रमांकावरील आणि दुसऱ्या क्रमांकावरील संघ तिसऱ्या क्रमांकावरील संघ एकमेकांविरुद्ध खेळतील.
अंतिम सामना.
Comments are closed.