ICC T20 WC 2026 – हिंदुस्थानची आता खरी कसोटी, अश्विनने दिला इशारा
हिंदुस्थानचा संघ म्हणजे लग्नातला तो वर जो अजून स्टेजवर नीट उभाही राहिला नाही आणि पाहुण्यांनी आधीच ‘वा! काय देखणा नवरदेव’ म्हणून टाळय़ा वाजवायला सुरुवात केलीय. हिंदुस्थानचा सुपर एटमध्ये प्रवेश झाला असला तरी हिंदुस्थानी संघ अजून टॉप गिअरमध्येच, असे परखड मत व्यक्त केलेय रविचंद्रन अश्विनने. साखळीत जी कामगिरी झाली ती सामान्यच होती. खरी कसोटी आणि कस सुपर एटमध्ये लागणार असल्याचे सांगत, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असा इशाराही दिलाय.
एका कार्यक्रमात बोलताना अश्विन नेहमीप्रमाणे भरभरून बोलला. सूर्याने नेतृत्व उत्तम केलं आहे, पण नेदरलँड्सविरुद्ध फलंदाजी फारशी रंगली नाही. हिंदुस्थानचा संघ इतका मजबूत आहे की, तो कोणत्याही परिस्थितीत प्रतिस्पर्ध्याला ‘आसमान’ दाखवू शकतो. पण अजून आपण पूर्ण क्षमतेने खेळलेलो नाही म्हणजेच अजून इंजिन गरम होतंय, धूर निघायला वेळ आहे!
तिलक वर्माबद्दल बोलताना अश्विनने खास ‘स्पिनर-तत्त्वज्ञान’ मांडलं. ‘आपण शक्ती, पॉवर-हिटिंग याबद्दल खूप बोलतो. पण फलंदाजीचं खरं सौंदर्य आहे ‘स्वीट स्पॉट’ आणि टायमिंग आहे. तो मोठा पॉवर-हिटर नाही; पण त्याच्याकडे परिस्थिती समजण्याची कला आहे. टी-20 म्हणजे फक्त षटकारांची आतषबाजी नाही. कधी कधी दोन धावा हुशारीने काढणंही सामना जिंकवतं,’ असा हलकासा चिमटा अश्विनने फटकेबाजांना काढला.
हिंदुस्थान उपांत्य फेरीत पोहोचणार, क्रिकेट दिग्गजांची एकमुखी भविष्यवाणी
प्रत्येक सामना बाद फेरीचा
साखळीतले सामने म्हणजे ट्रेलर. आता सुरू होणार आहे मुख्य चित्रपट. प्रत्येक सामना बाद फेरीसारखा. चूक केली तर थेट ‘आऊट ऑफ थिएटर.’ हिंदुस्थान आत्मविश्वासू आहे, पण सुधारण्याची जागा आहे. कमपुवत दुवे दुरुस्त केले तर जेतेपदाचा रस्ता रुंद होईल, असं अश्विनने स्पष्ट केलं. थोडक्यात काय तर हिंदुस्थान अजून पूर्ण ताकदीने खेळलेला नाही आणि तरीही बाकी संघांना घाम फुटलाय. जर खरोखरच इंजिन फुल स्पीडमध्ये आलं तर प्रतिस्पर्ध्यांनी आधीच सीटबेल्ट लावलेले बरे!
Comments are closed.