धर्मदाय आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकार कोणी दिला? स्थगिती नाही व्यवहार रद्द करा..! पुण्या


पुणे जैन बोर्डिंग जमीन: पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जागा विक्री प्रकरणाची (Pune Jain Boarding Land) मुंबई येथे धर्मादाय आयुक्तालयात काल (सोमवार दि. 20) या प्रकरणाची तातडीची सुनावणी पार पडली. धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी या प्रकरणावर ‘स्टेटस्को’ म्हणजेच परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे जैन समाजाच्या संघर्षाला न्यायालयीन पाठबळ मिळालं असून जागेच्या विक्रीला तातडीचा ब्रेक लागला आहे. धर्मादाय आयुक्तांच्या स्थगितीनंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी संताप व्यक्त करत धर्मदाय आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल करत स्थगिती नाही व्यवहार रद्द करा..! अशी मागणी केली आहे.(Pune Jain Boarding Land)

त्याचबरोबर त्यांनी या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. धंगेकर म्हणालेत, ‘या प्रकरणात पदाचा गैरवापर करणारे मुरलीधर मोहोळ, जमिनीच्या विक्रीस नियमबाह्य परवानगी देणारे राज्याचे मुख्य धर्मदाय आयुक्त, कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती देत धर्मदाय आयुक्तांची फसवणूक करणारे मेरिट कन्सल्टन्सी व बिल्डर विशाल गोखले यांच्यावर गुन्हे दाखल करावे. पुण्यातील धर्मादाय सहआयुक्तांना या प्रकारची चौकशी करण्याचे आदेश म्हणजे राज्याचे मुख्य धर्मदाय आयुक्त यांनी केवळ स्वतःची फसवणूक झाली आहे, असा दिखावा करण्यासाठी केलेला उद्योग आहे”. धंगेकरांनी त्यांच्या सोशल मिडीया एक्सवरून याबबातची एक पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान मुरलीधर मोहोळ यांनी संबंधित कंपनीसोबत काहीही संबंध नसल्याचं सांगितल्यानंतर देखील धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Ravindra Dhangekar Post: धंगेकरांची पोस्ट काय?

“धर्मदाय आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकार काय..? स्थगिती नाही व्यवहार रद्द करा..! या प्रकरणात पदाचा गैरवापर करणारे मुरलीधर मोहोळ, जमिनीच्या विक्रीस नियमबाह्य परवानगी देणारे राज्याचे मुख्य धर्मदाय आयुक्त, कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती देत धर्मदाय आयुक्तांची फसवणूक करणारे मेरिट कन्सल्टन्सी व बिल्डर विशाल गोखले यांच्यावर गुन्हे दाखल करावे. पुण्यातील धर्मादाय सहआयुक्तांना या प्रकारची चौकशी करण्याचे आदेश म्हणजे राज्याचे मुख्य धर्मदाय आयुक्त यांनी केवळ स्वतःची फसवणूक झाली आहे, असा दिखावा करण्यासाठी केलेला उद्योग आहे.राज्याच्या मुख्य धर्मदाय आयुक्तांनी या जमीन घोटाळ्यासाठी कुठली शहानिशा न करता नियमबाह्य कामकाज केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.”

“तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्याशी संबंधित व्यक्ती व संस्था यांना लाभ होईल अशा प्रकारे राज्याच्या मुख्य धर्मदाय आयुक्तांवर दबाव टाकत नियमबाह्यपणे पब्लिक ट्रस्टची प्रॉपर्टी विकण्याची तातडीने परवानगी मिळवून दिली. आपल्या केंद्रीय सहकार राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत राज्यातील दोन बँकांना नियमबाह्य पद्धतीने दोन दिवसात 70 कोटी रुपयांचे कर्ज द्यायला सांगितले. आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करत अवघ्या दोन दिवसांमध्ये कर्ज प्रकरण , तारण व जागेची खरेदी ही सगळी प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने वापरून प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर केला.त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे.”

“या जागेबाबतची कागदपत्रे सादर करत असताना नकाशावरील जैन मंदिराचा उल्लेख “ओल्ड स्ट्रक्चर” असा करत धर्मदाय आयुक्त व बँक यांची फसवणूक केल्याबद्दल या मालमत्तेचे व्हॅल्युएशन करणारी संस्था मेरिट कन्सल्टन्सी व  बिल्डर गोखले कन्स्ट्रक्शन यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे.”

Pune Jain Boarding Land: जागेचा नेमका वाद काय?

पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा शिवाजी नगर येथे आहे. जिथे दिगंबर जैन बोर्डिंग आणि शेतंबर जैन बोर्डिंग आहे. 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी या वसतीगृहाची उभारणी केली होती. ही जागा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती. कारण विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास करण्यास इच्छूक होते. तर समाजातील काही लोकांनी याला विरोध केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच ही जागा परस्पर हडप करुन तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून केला जात आहे. पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम, कायद्यांची पायमल्ली केली. या जमीनविक्रीच्या व्यवहाराशी संबंध असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी लागेबांधे असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

Murlidhar Mohol: खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप

या प्रकरणात गोखले कन्स्ट्रक्शन या कंपनीचं नाव समोर आलं असून, याच कंपनीसोबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी होती, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावरून आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट मोहोळ यांच्यावर टीका करत त्यांना राजीनामा देण्याची मागणी केली आहे. धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणाच्या चौकशीसाठी पत्र लिहिण्याची घोषणा केली असून, समाजाच्या भावना दुखावणाऱ्या व्यवहारात केंद्रीय मंत्री सहभागी असतील, तर त्यांनी स्वतःहून पद सोडावे, अशी मागणी केली आहे.

Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण

खासदार मोहोळ यांनी या सर्व आरोपांना विरोध केला असून म्हटलं की, पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीच्या व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही. ज्या गोखले बिल्डर्सशी माझी भागीदारी असल्याचा आरोप होत आहे, त्यांच्या दोन्ही कंपन्यांमधून मी वर्षभरापूर्वीच बाहेर पडलो होतो. त्यामुळे जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

आणखी वाचा

Comments are closed.