RBI रेपो रेट वाढवणार की जैसे थे ठेवणार? वर्षाअखेरीस मोठ्या निर्णयाची शक्यता, गृहकर्ज महागणार?
आरबीआय रेपो रेट मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण विषयक समितीची रेपो रेट ठरवण्यासाठी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठक होणार आहे. आरबीआयच्या पतधोरण विषयक समितीची बैठक 4 जून ते 6 जूनला मुंबईत होईल. त्यानंतर 6 जूनला आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा पत्रकार परिषद घेऊन रेपो रेट संदर्भातील निर्णय जाहीर करतील. बहुतांश अर्थतज्ज्ञांच्या मते आरबीआय जूनचे पतधोरण जाहीर करताना रेपो रेट जैसे थे ठेवण्याची शक्यता आहे. महागाई वाढत असताना आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास कर्जे देखील महागण्याची शक्यता आहे. रॉयटर्सच्या पोलमध्ये बहुतांश अर्थतज्ज्ञांनी या वर्षाच्या अखेरीस एका रेपो रेट वाढवले जाण्याची शक्यता वर्तवली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली वाढ आणि रुपयावरील दबावामुळं कमी प्रमाणात गुंतवणूक झाल्यास एकदा रेपो रेट वाढवला जाऊ शकतो, असा अंदाज तज्त्रांनी वर्तवला आहे.
रेपो रेट कायम राहण्याची शक्यता
भारतात महागाईला सुरुवात झाली असून एप्रिलमध्ये महागाईचा दर 3.8 टक्के होता. आरबीआयचं एका वर्षाचं मीडियम टर्म टार्गेट 4 टक्के इतकं आहे. महागाईचा दर 4 टक्क्यांवर गेल्यास आरबीआयला तातडीनं पावलं उचलावी लागतात.
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध सुरु झाल्यानंतर क्रूड ऑईलच्या दरात 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे रुपया 6 टक्क्यांनी कमजोर झाला आहे.होलसेल महागाईत एप्रिल महिन्यात वाढ झाली होती. यामुळं महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी धोरणात्मक पावलं उचलली जातील, असं काही अर्थतज्ज्ञांना वाटत आहे. रॉयटर्सच्या पोलमध्ये 56 पैकी 44 अर्थतज्ज्ञांनी रेपो रेट कायम राहील, असं म्हटलं. रेपो रेट सध्या 5.25 टक्के इतका आहे. तर, 11 अर्थतज्ज्ञांनी रेपो रेटमध्ये 0.25 बेसिस पॉईंटनं वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर, एका अर्थतज्ज्ञांनं रेपो रेट 0.50 बेसिस पॉईंटनं वाढवण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून फेब्रुवारी 2025 पासून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली होती. फेब्रुवारी 2025 पूर्वी रेपो रेट 6.50 टक्के होता. त्यात आरबीआयनं वेळोवेळी कपात करत तो दर 5.25 टक्क्यांवर आणला होता. आता पेट्रोल डिझेलचे वाढते दर, वाढती महागाई या पार्श्वभूमीवर आरबीआय रेपो रेट वाढवणार की कमी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
गृहकर्ज महागणार?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट कायम ठेवल्यास गृहकर्जाचा व्याज दर कायम राहील. जर आरबीआयनं रेपो रेट वाढवला तर त्या प्रमाणात गृहकर्ज देखील महाग होईल. ज्या कर्जदारांचा गृहकर्जाचा व्याज दर रेपो रेट आधारित असेल त्यांना रेपो रेट वाढल्यास अधिक व्याज द्यावं लागेल.
आणखी वाचा
Comments are closed.