आरसीबीने अचानक हिरवी जर्सी का घातली? कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल!

आयपीएल 2026 मधील 26व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात सामना सुरू आहे. हा सामना बेंगलुरूमधील एम. चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात असून, होम ग्राउंडवर खेळताना आरसीबीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी संघ पारंपरिक लाल जर्सीऐवजी हिरव्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरला आहे.

आरसीबीच्या या हिरव्या जर्सीमागे एक खास सामाजिक संदेश दडलेला आहे. पर्यावरण संवर्धन आणि निसर्गाचे महत्त्व याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी फ्रँचायझी दरवर्षी एक सामना ‘ग्रीन जर्सी’मध्ये खेळते. 2011 पासून सुरू झालेली ही परंपरा आजही कायम आहे. विशेष म्हणजे, ही जर्सी 100 टक्के रिसायकल केलेल्या साहित्यापासून तयार करण्यात आली असून ती कार्बन-न्यूट्रल मानली जाते. लाखो चाहत्यांपर्यंत पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहोचवण्याचा हा आरसीबीचा अनोखा प्रयत्न आहे.

मात्र, या ग्रीन जर्सीमध्ये आरसीबीचा रेकॉर्ड काहीसा निराशाजनक राहिला आहे. आतापर्यंत संघाने या जर्सीत 15 सामने खेळले असून त्यापैकी 9 वेळा पराभव स्वीकारावा लागला आहे. फक्त 5 सामने जिंकण्यात संघाला यश आले, तर एक सामना अनिर्णीत राहिला. विशेष म्हणजे, आरसीबीने ग्रीन जर्सीमध्ये पहिला सामना कोच्ची टस्कर्स केरळविरुद्ध खेळला होता.

दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे आरसीबीला घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागले. गतविजेता असलेल्या आरसीबीने यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सला या सामन्यात विजय मिळवून पुन्हा विजयाच्या मार्गावर परतण्याची संधी आहे.

या सामन्यात केवळ खेळाचीच नाही, तर पर्यावरणाबाबतच्या संदेशाचीही तितकीच चर्चा रंगताना दिसत आहे. आरसीबीचा हा उपक्रम चाहत्यांकडूनही मोठ्या प्रमाणात कौतुकास पात्र ठरत आहे.

Comments are closed.