मॅच न खेळता आरसीबी जाणार फायनलमध्ये? क्वालिफायर-1 सामन्यापूर्वी धर्मशालामधून आली मोठी बातमी

RCB vs GT क्वालिफायर 1 अपडेट : आयपीएल 2026 च्या प्लेऑफला आजपासून (26 मे) सुरुवात होत असून पहिल्याच क्वालिफायरमध्ये पावसाची एन्ट्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डिफेंडिंग चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि माजी विजेता गुजरात टायटन्स यांच्यात धर्मशालामध्ये होणाऱ्या क्वालिफायर-1 सामन्यावर हवामानाचं मोठं संकट घोंगावत आहे. लीग स्टेजनंतर गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिलेल्या बंगळुरूचा सामना दुसऱ्या क्रमांकावरील गुजरातशी होणार असल्याने हा सामना अत्यंत रोमांचक ठरण्याची अपेक्षा होती. मात्र आता पाऊस चाहत्यांचा हिरमोड करू शकतो.

अॅक्युवेदरच्या अंदाजानुसार सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत धर्मशालामध्ये 50 टक्क्यांहून अधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मैदान ओलं राहण्याची शक्यता असून सामना उशिरा सुरू होणे, षटकं कमी होणे किंवा पूर्ण सामना रद्द होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

धर्मशाला हे हिमालयाच्या कुशीतलं डोंगराळ ठिकाण असल्यामुळे तिथे हवामान क्षणार्धात बदलतं. दिवसभर मुसळधार पाऊस झाल्यास संध्याकाळी आकाश स्वच्छ राहील याची कोणतीही खात्री नाही. नियोजित वेळेनुसार सामन्याचा टॉस संध्याकाळी 7 वाजता, तर सामना 7.30 वाजता सुरू होणार आहे.

धर्मशालामधील पावसाचा अंदाज (Dharamshala Weather Rain Update)

सकाळी 10 वाजता – 49%
सकाळी 11 वाजता – 55%
दुपारी 12 वाजता – 53%
दुपारी 1 वाजता – 40%
दुपारी 2 वाजता – 34%
दुपारी 3 वाजता – 38%
सायंकाळी 4 वाजता – 47%
सायंकाळी 5 वाजता – 48%
सायंकाळी 6 वाजता – 54%

पावसामुळे RCB थेट फायनलमध्ये? (RCB vs GT Qualifier 1 Dharamshala Weather Rain Update)

आयपीएलच्या नियमांनुसार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्यांसाठी रिझर्व डे ठेवलेला नाही. त्यामुळे जर पावसामुळे सामना पूर्णपणे रद्द झाला, तर गुणतालिकेत वरच्या स्थानावर असलेल्या संघाला थेट पुढच्या फेरीत प्रवेश दिला जातो.

याचा सर्वात मोठा फायदा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूला होऊ शकतो. कारण लीग स्टेजनंतर आरसीबी अव्वल स्थानावर होती. त्यामुळे क्वालिफायर-1 पावसामुळे रद्द झाल्यास बंगळुरू थेट फायनलमध्ये पोहोचेल. दुसरीकडे गुजरात टायटन्सला मग क्वालिफायर-2 खेळावा लागेल.

यंदाच्या प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या चार संघांनी प्रवेश मिळवला आहे. आता हवामान कोणाचा गेम बिघडवतं आणि कोणाला थेट फायनलचं तिकीट मिळतं, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा –

Shreyas Iyer Sister Shreshta Iyer Controversy: सर्व मर्यादा ओलांडल्या, मला अश्लील भाषेत…; श्रेयस अय्यरची बहीण संतापली, व्हिडीओद्वारे सगळं सांगितलं

आणखी वाचा

Comments are closed.