भारताला हरवणाऱ्या 'त्या' भारतीय खेळाडूच्या आईची रिऍक्शन व्हायरल; म्हणाल्या, “टीम इंडियाच्या पराभवाने दु:खी, मात्र…”
आयर्लंड क्रिकेट संघाला २६ जून २०२६ चांगलाच लक्षात राहिल. याच दिवशी त्यांनी भारताविरुद्ध आपला पहिला-वहिला आंतरराष्ट्रीय विजय मिळवला. सध्या भारतीय पुरुष क्रिकेट संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये दोन सामन्यांची टी२० मालिका खेळली जात असून यजमान संघांनी बेलफास्टमध्ये झालेला सामना ३४ धावांनी जिंकला आणि इतिहास रचला. यामध्ये आयर्लंडकडून एका भारतीय खेळाडूने पदार्पण करताना संघाच्या विजयात महत्त्वाची भुमिका बजावली.
वेगवान गोलंदाज जय मुंद्रा याने शुक्रवारी (२६ जून) आयर्लंडकडून आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. प्रथम तर तो फलंदाजीवेळी २ धावा करत नाबाद राहिला आणि नंतर त्याने भारताचा आघाडीचा आणि लयीत असेलल्या संजू सॅमसनला क्लीन बोल्ड केले. तसेच शिवम दुबेला चेंडू टाकत त्याचा उत्तमरित्या झेलही घेतला. त्याने चार षटकांत २५ धावा देत २ विकेट्स घेतल्या.
जयच्या या कामगिरीवर त्याचे कुटुंबीय खूष झाले असून त्याच्या आईने विद्या मुंद्राने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “मी खूप आनंदी आहे. टीम इंडिया हरली याचे मला दु:ख आहे, मात्र माझ्या मुलाची कामगिरी इतकी चांगली होती की त्याने देशाला आणि राजस्थानला गौरव मिळवून दिला. मला त्याचा खूप अभिमान आहे.”
“जयला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आहे. वडिलांच्या आग्रहाखातर त्याने दहावीनंतर अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. जयने आधी पदवी मिळवावी आणि मग क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला गंभीरतेने पुढे नेण्यास सुरूवात केली”, असे विद्या यांनी पुढे सांगितले.
जयचे कुटुंब सध्या राजस्थानमध्येच राहत आहे. तो शिक्षणासाठी आयर्लंडला गेला असता तेथेच स्थायिक झाला आणि तेथील नागरिकत्व मिळवले. शिक्षणानंतर त्याने आयरिश क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण केले. शेवटी त्याला भारताविरुद्धच पदार्पण करण्याची संधी मिळाली. या संधीचा पुरेपूर फायदा घेत त्याने पहिल्याच सामन्यात दोन विकेट्स घेण्याची उत्तम कामगिरी केली.
Comments are closed.