बारामतीत सुनेत्रा पवार तर राहुरीत अक्षय कर्डिले विजयी
महाराष्ट्रात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी महायुतीची सरशी झाली. बारामतीत अजित पवार गटाच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्डब्रेक मतांनी विजय झाला. तर राहुरीमध्ये भाजप उमेदवार अक्षय कर्डिले मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. महाविकास आघाडीनेही त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होते. पण 22 अपक्षांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यामुळे ही निवडणूक झाली. त्यांना आव्हान देणाऱ्या अपक्ष उमेदवारांना दुहेरी व तिहेरी मतांचा आकडाही ओलांडता आला नाही. सर्वच अपक्ष उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले. सुनेत्रा पवार यांचा तब्बल 2 लाख 18 हजार 930 एवढ्या मताधिक्याने ऐतिहासिक विजय झाला. या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या 2019च्या निवडणुकीतील मताधिक्याचा विक्रम मोडीत काढला.
भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक झाली. या ठिकाणी भाजपकडून शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोविंद मोकाटे रिंगणात होते. या निवडणुकीत अक्षय कर्डिले विक्रमी मतांनी विजयी झाले. अक्षय कर्डिले यांना एकूण 1 लाख 40 हजार 93 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार गोविंद मोकाटे यांना 27 हजार 506 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे संतोष शेळके यांना 5690 मते मिळाली.
हा विजय अजितदादांच्या कार्याला पुढे नेण्याची जबाबदारी – सुनेत्रा पवार
हा विजय माझ्यासाठी केवळ राजकीय यश नसून आदरणीय दादांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतींना दिलेली खरी आदरांजली आहे. अजितदादांनी महाराष्ट्रासाठी आणि बारामतीसाठी केलेले कार्य, त्यांची जनतेशी असलेली नाळ आणि विकासाची त्यांची दृष्टी आजही प्रत्येकाच्या मनात कायम आहे. त्यांचे विचार आणि संस्कारच मला पुढे जाण्याची ताकद देत आहेत. हा विजय म्हणजे त्यांच्या स्वप्नांना आणि त्यांच्या कार्याला पुढे नेण्याची जबाबदारी आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
बारामतीत मताधिक्याचा नवा विक्रम
सुनेत्रा पवार यांनी 2 लाख 18 हजार 930 मताधिक्याने विजय मिळवत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. याआधी देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम उत्तर प्रदेशातील साहिबाबाद मतदारसंघाचे आमदार सुनील कुमार शर्मा यांच्या नावावर होता. त्यांनी 2022च्या निवडणुकीत 2 लाख 14 हजार 835 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.
मतदारांचा विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न करू – अक्षय कर्डिले
राहुरीतील जनतेने शिवाजीराव कर्डिले यांच्याप्रमाणेच माझ्यावर विश्वास दाखवला व मला संधी दिली. मतदारांचा हा विश्वास आपण आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया अक्षय कर्डिले यांनी माध्यमांशी बोलताना केली. गेली 30 वर्षे शिवाजीराव कर्डिले यांनी प्रत्येक कुटुंबात, प्रत्येकाच्या हृदयात घर केले होते, स्थान मिळवले होते. तेवढेच प्रेम, विश्वास जनतेने माझ्याबद्दल दाखवून मला संधी दिली आहे. आगामी काळात जनतेने दिलेल्या या संधीचा उपयोग करून सर्वांना सोबत घेऊन काम करू, असे अक्षय कर्डिले म्हणाले.
Comments are closed.