संभल हिंसाचारातील आरोपी मुल्ला अफरोजला दिलासा
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
नवी दिल्ली: संभल हिंसेप्रकरणी एनएसए अंतर्गत आरोपी असलेल्या मुल्ला अफरोजच्या कोठडीवरून सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी कठोर भूमिका घेत उत्तरप्रदेश सरकारला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कथित कबुलीच्या आधारावर आरोपीला ताब्यात घेण्याचा आदेश दिला जाऊ शकत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि शील नागू यांच्या खंडपीठाने मुल्ला अफरोजची कोठडी रद्द केली आहे. न्यायालयाबाहेर देण्यात आलेली कबुली कुणालाही खबरदारी दाखल ताब्यात घेण्याचा आधार ठरू शकत नाही. अशास्थितीत ताब्यात घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी अन्य परिस्थितींविषयी विचार करावा. अधिकाऱ्यांनी अन्य संबंधित दुवे जोडण्याऐवजी स्वत:च्या अधिकारांचा गैरवापर केल्याची टिप्पणी खंडपीठाने केली आहे. संभलमध्ये शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान हिंसा झाली होती. नोव्हेंबर 2024 मध्ये हिंसा भडकविल्याचा आरोप अफरोजवर आहे. या प्रकरणी त्याला मुख्य सूत्रधार ठरविण्यात आले आहे. या हिंसेत 4 जण मारले गेले होते. अफरोजला याप्रकरणी उच्च न्यायालयाने मागील वर्षी जामीन मंजूर दिला होता. त्यानंतर त्याच्या विरोधात एनएसए अंतर्गत नजरकैदेचा आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आला होता.
Comments are closed.