'तेजस एमके-1ए' स्क्वाड्रन लवकरच तयार होणार आहे.
वर्षाच्या अखेरपर्यंत मिळणार आणखी 12 इंजिन्स : जीईकडून पुरवठ्याशी संबंधित आश्वासन
भारतीय वायुदलाचा स्वदेशी लढाऊ विमान तेजस एमके-1ए कार्यक्रमात दीर्घकाळापासून येत असलेली इंजिन समस्या आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत भारताला जीई एअरोस्पेस कंपनीकडून आणखी 12 एफ404 इंजिन्स मिळणार असल्याची पुष्टी संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडे यापूर्वीच 27 तेजस एमके-1ए एअरफ्रेम तयार असल्याने ही इंजिन्स लवकर मिळणे आवश्यक ठरले होते. आतापर्यंत 10 इंजिन्स प्राप्त झाली असून उर्वरित एअरफ्रेमचे परीक्षण किंवा राखीव इंजिनच्या मदतीने उ•ाण घडवून आणले जातेय. अंतिम इंटीग्रेशन आणि व्हॅलिडेशनचे काम जारी आहे.
जीई एअरोस्पेसने दर महिन्याला 4 इंजिन्स पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे 2026 च्या अखेरपर्यंत कमीतकमी एक पूर्ण तेजस एमके-1ए स्क्वाड्रन वायुदलाच्या ताफ्यात सामील करण्याचे सरकारचे लक्ष्य पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे. तेजस एमके-1ए कार्यक्रमात सर्वात मोठा अडथळा इंजिनच्या कमतरतेचा राहिला आहे. एचएएलने एअरफ्रेम तयार केले, परंतु इंजिन उपलब्ध न झाल्याने विमान तयार करता येत नव्हते. आता संरक्षण मंत्रालयानुसार जीईकडून पुरवठा नियमित स्वरुपात होणार आहे.
चालू वर्षाच्या अखेरपर्यंत 12 अतिरिक्त इंजिन्स उपलब्ध झाल्याने सध्या तयार एअरफ्रेमना लढाऊ विमानात बदलण्याच्या कामाला वेग येणार आहे. 27 एअरफ्रेम तयार आहेत, परंतु अंतिम डिलिव्हरी परीक्षण आणि इंटीग्रेशनवर निर्भर असल्याचे यापूर्वी एचएएलचे अध्यक्ष रवि यांनी म्हटले होते. खासकरून रडार आणि शस्त्रास्त्र प्रणालीच्या इंटीग्रेशनशी संबंधित तांत्रिक समस्या आता सोडविली जात आहे. इंजिन मिळण्यासोबत हे काम पूर्ण झाल्यावर विमान संचालनासाठी तयार होऊ शकेल.
180 विमानांची मोठी ऑर्डर
भारतीय वायुदलाने तेजस एमके-1एच्या एकूण 180 विमानांची ऑर्डर दिली आहे. पहिला करार फेब्रुवारी 2021 साली 83 लढाऊ विमानांसाठी झाला होता. दुसरा करार सप्टेंबर 2025 मध्ये 97 अतिरिक्त विमानांसाठी करण्यात आला होता. यात 68 लढाऊ विमाने आणि 29 ट्विन-सीटर सामील आहेत. या व्यवहारासाटी 62,370 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. दुसऱ्या कराराची डिलिव्हरी 2027-28 मध्ये सुरू होत 6 वर्षांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. या ऑर्डरमध्ये स्वदेशी सामग्रीचे प्रमाण आणखी वाढविण्यात आले आहे. विमानात 34 टक्क्यांपेक्षा अधिक स्वदेशी सामग्री वापरण्यात येईल. यात स्वदेशी उत्तम एईएसए रडार, स्वयं सुरक्षा कवच आणि स्वदेशी कंट्रोल-सरफेस एक्चुएटर्स सामील आहे.
एचएएलचे नवे लक्ष्य
दुसऱ्या ऑर्डरच्या 97 विमानांसाठी एचएएलने नोव्हेंबर 2025 मध्ये जीई एअरोस्पेसशी वेगळा करार केला आहे. यात 113 एफ404-जीई-आयन20 इंजिन आणि संबंधित सपोर्ट पॅकेज सामील आहे. ही इंजिन्स 2027-32 दरम्यान प्राप्त होतील. यामुळे दीर्घ कालावधीत पुरवठा सुनिश्चित होऊ शकणार आहे. एचएएल स्वत:च्या उत्पादन सुविधेचा विस्तार करत आहे. कंपनीचे लक्ष्य दरवर्षी सुमारे 24 विमानांच्या निर्मितीचे आहे.
Comments are closed.