राम मंदिर गैरव्यवहार प्रकरणी अहवाल सादर.

प्राथमिक अहवालानंतर अंतिम अहवालही लवकरच

वृत्तसंस्था/ लखनौ (उत्तर प्रदेश)

अयोध्येतील राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांचा अपहार केल्याच्या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष अन्वेषण दलाने त्याचा प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. मंगळवारी हा अहवाल राज्याचे गृहसचिव संजय प्रसाद यांना सादर करण्यात आला. राम मंदीर व्यवस्थापनाच्या प्रत्येक पातळीवर प्रक्रियात्मक आणि व्यवस्थापकीय त्रुटी आढळून आल्या आहेत, असे निरीक्षण या अहवालात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

या प्राथमिक अहवालाची सविस्तर माहिती अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नसली, तरी अहवालाचा आशय स्पष्ट करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारनेन या अपहाराचा तपास करण्यासाठी लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वात विशेष अन्वेषण दलाची स्थापना केली आहे. या दलाने राम मंदीराचे हिशेब तपासले आहेत. तसेच देणग्या आणि दानांचा हिशेबही तपासला आहे. दानपेट्या, देणगी वस्तू ठेवले जाणारे कक्ष आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फूटेज यांचीही तपासणी करण्यात आली आहे. राम मंदीराला भेट देण्यात येणाऱ्या वस्तू तसेच निधीचे दान यांची हाताळणी राम मंदीराच्या कर्मचाऱ्यांकडून कशी केली जाते, याचीही पाहणी विशेष अन्वेषण दलाने केली.

सुवर्णदान आणि निधीदान

प्रतिदिन सहस्रावधी भाविक या राम मंदिराला भेट देतात. ते दानपेटीत धनदान करतात. तसेच अनेक धनिक भाविकांनी राम मंदिराला सुवर्णशीळा, सोन्याची आभूषणे, चांदीची आभूषणे आदींचे दान करतात. या वस्तूंचे आणि धनाचे हिशेब कसे ठेवले जातात, याची तपासणी करण्यात आली आहे. भक्तांनी दान केलेल्या मूळच्या सोन्याच्या वस्तूंच्या स्थानी तशाच दिसणाऱ्या बनावट वस्तू ठेवून मूळच्या सोन्याच्या वस्तूंचा अपहार करण्यात आला आहे, असा आरोप केला जात आहे.

अंतिम अहवाल लवकरच

प्राथमिक अहवालानंतर आता या प्रकरणाच्या अन्वेषणाचा अंतिम अहवाल एका आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. अंतिम अहवाल सादर झाल्यानंतर या प्रकरणावर नेमका प्रकाश पडेल आणि बऱ्याच बाबी बाहेर पडतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हा अपहार नेमका किती रकमेचा आहे, याचीही माहिती अंतिम अहवालात असेल, अशी अपेक्षा केली जात आहे. सध्या या अपहाराची व्याप्ती 50 कोटी रुपयांपासून 300 कोटी रुपयांपर्यंत असल्याचा आरोप आहे.

अनेक कर्मचाऱ्यांची चौकशी

विषेश अन्वेषण दलाने या प्रकरणात अनेक कर्मचाऱ्यांचाही तपास केला. जे कर्मचारी प्रत्यक्ष दानधनाची हाताळणी करत होते, त्यांचीही कसून चौकशी करण्यात आली आहे. धनाच्या हाताळणीच्या प्रक्रियेत अनेक त्रुटी आढळल्या आहेत. त्यांच्यासंबंधीं संबंधितांकडे दलाने विचारणा केली आहे. अंतिम अहवालानंतर आतापर्यंत ज्ञात नसलेल्या बाबी उघड होतील, अशी शक्यता आहे.

राजकीय पडसाद

या अपहार प्रकरणाचे तीव्र राजकीय पडसाद अपरिहार्यपणे उमटत आहेत. राज्य सरकारचे दुर्लक्ष या अपहाराला कारणीभूत आहे. तसेच राम मंदिराच्या विश्वस्तांची आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. राज्य सरकारच या अपहाराला नैतिकदृष्ट्या उत्तरदायी असून राम मंदिराचे विश्वस्त मंडळ भंग करावे, अशी मागणी होत आहे. विश्वस्त मंडळाचे प्रमुख चंपत राय यांच्या साहाय्यकाकडेही संशयाची सुयी आहे. त्याला अटक होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंधरा दिवसांमध्ये चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. नंतर कायदेशीर प्रक्रिया होणार आहे.

प्राथमिक अहवालात अनेक निरीक्षणे

ड देणग्यांच्या हाताळणीत अनेक त्रुटी असल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट

ड अंतिम अहवाल स्पष्ट करणार अपहाराचे स्वरुप, उपायही सुचविले जाणार

ड अपहारकर्ता कितीही उच्चपदस्थ असला तरी कारवाई होणार : आदित्यनाथ

ड या प्रकरणाला राज्य सरकारच उत्तरदायी असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप

Comments are closed.