कोका-कोला खरेदी करण्यावरून संसद सदस्याने उपस्थित केले प्रश्न; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
अमेरिकेतील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना अन्नधान्य खरेदीसाठी आर्थिक मदत पुरवणाऱ्या ‘SNAP’ (Supplemental Nutrition Assistance Program) या सरकारी अन्न सहाय्य योजनेवरील संसदीय सुनावणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या सुनावणीदरम्यान रिपब्लिकन पक्षाचे खासदार ब्रँडन गिल यांनी करदात्यांच्या पैशांचा वापर कोका-कोलासारखी साखरयुक्त पेये खरेदी करण्यासाठी केला जावा का? असा थेट प्रश्न उपस्थित करत या धोरणावर आक्षेप घेतला.
सुनावणीदरम्यान खासदार ब्रँडन गिल यांनी उपस्थित असलेल्या एका पॉलिसी ॲडव्होकेटला कोका-कोलामध्ये काही पौष्टिक मूल्य आहे का आणि अमेरिकन नागरिकांना जगण्यासाठी कोका-कोलाची खरोखर गरज आहे का, असे प्रश्न विचारले. यावर त्यांनी केवळ ‘हो’ किंवा ‘नाही’ असे स्पष्ट उत्तर देण्याचा आग्रह धरला. मात्र, संबंधित धोरण समर्थकाने यावर थेट उत्तर देणे टाळले. आपले कौशल्य अन्न सुरक्षेत असून पोषणशास्त्रात नाही, असे सांगत पोषणाशी संबंधित प्रश्नांवर आपण सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करू, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘SNAP’ ही अमेरिकेतील एक अत्यंत महत्त्वाची सरकारी योजना असून त्याची तुलना हिंदुस्थानच्या शिधावाटप योजनेशी करता येऊ शकते. सध्या अमेरिकेतील 4 कोटींहून अधिक नागरिक या योजनेचा लाभ घेत असून याद्वारे गरीब कुटुंबांना दरमहा अन्नपदार्थ खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या निधीचा वापर कोका-कोला आणि इतर साखरयुक्त पेये खरेदी करण्यासाठीही केला जाऊ शकतो. यावरूनच सध्या हा नवा वाद निर्माण झाला आहे. खासदार ब्रँडन गिल यांच्या मते, आरोग्यासाठी हानिकारक असणाऱ्या वस्तूंवर करदात्यांचा पैसा खर्च करणे चुकीचे आहे. दुसरीकडे, काही तज्ज्ञांच्या मते, सरकारचे काम लोकांना अन्न मिळवून देणे आहे, नागरिकांनी बाजारातील कोणते कायदेशीर अन्नपदार्थ खरेदी करावेत हे ठरवणे सरकारचे काम नाही. या दोन्ही बाजूंच्या मतप्रवाहांमुळे सोशल मीडियावर या सुनावणीच्या व्हिडीओवरून मोठी चर्चा रंगली आहे.
Comments are closed.