बेन स्टोक्सची बादशाहत संपली! रिषभ पंत बनला WTC मधील नवा सिक्सर किंग
भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) इतिहासात एक मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, पंतने एक षटकार मारून इतिहासात आपले नाव नोंदवले. यासह, तो WTC मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला असून, त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्सला मागे टाकले आहे.
पंतच्या नावावर आता WTC मध्ये 89 षटकार झाले आहेत, तर बेन स्टोक्सने 88 षटकार मारले आहेत. विशेष म्हणजे, या यादीतील पहिल्या पाच फलंदाजांमध्ये चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
पंतने आतापर्यंत 44 WTC सामन्यांच्या 76 डावांमध्ये 89 षटकार मारले आहेत, तर बेन स्टोक्सने 64 सामन्यांच्या 117 डावांमध्ये 88 षटकार मारले आहेत. भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 40 सामन्यांच्या 69 डावांमध्ये 56 षटकार मारले आहेत. रोहितने 2025 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
भारतीय कर्णधार शुबमन गिल 48 षटकारांसह चौथ्या क्रमांकावर आहे; त्याने 44 सामन्यांच्या 78 डावांमध्ये हा पराक्रम केला आहे. दरम्यान, युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल 45 षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे. गिल आणि जयस्वाल यांच्यात केवळ तीन षटकारांचे अंतर आहे.
दुसरीकडे, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ चिंतेच्या स्थितीत सापडला आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 356 धावा केल्या. सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडची अवस्था 4 बाद 110 धावा अशी केली होती, ज्यामुळे त्यांची खेळी लवकर संपेल असे वाटत होते. मात्र, टॉम ब्लंडेलने 89 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर टॉम लॅथमने 59 धावांचे योगदान दिले.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या 6 बाद 116 अशी होती. परिणामी, भारत अजूनही न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा 240 धावांनी मागे आहे.
Comments are closed.