झाड पडल्यामुळे मृत्यूच्या घटना, प्रश्न विचारताच महापौर संतापल्या , मी गेले दोन महिने फिरतेय मा
मुंबई : मुंबईत मुसळधार पावसादरम्यान झाड कोसळण्याच्या घटना गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. मागील 6 दिवसांत मुंबईतील विविध भागात झाड कोसळण्याचा घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये स्कूल बसवरती झाड कोसळून एका 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता कुर्ल्यातही झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला. कुर्ल्याच्या नौपाडा भागात दुपारी 12.40 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.त्याचबरोबर आरे कॉलनीत झाड पडल्याने बाईक चालकाचा मृत्यू झाला असल्याची दुर्घटना घडली आहे, तर कुर्ल्यातील घटनेनंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेत घटनास्थळी आंदोलनाला सुरूवात केली, या दुर्घटना पालिका प्रशासन दाबायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे, तर याप्रकरणी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी संताप व्यक्त केला आहे, झाड पडल्यामुळे मृत्यूच्या घटनांवरती प्रश्न विचारताच महापौर संतापल्याचे दिसून आले, मी गेले दोन महिने फिरतेय मान्सूनपूर्व कामांच्या पाहणीसाठी फिरले त्याचबरोबर विरोधकांनी केलेल्या रिलस्टार टीकेवरती देखील यावेळी त्यांनी संताप व्यक्त करत विरोधकांना धारेवरती धरलं आहे.
माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ही दुर्दैवी घटना आहे. यामध्ये पालिका प्रशासनाला पाठिंशी घालण्याचं किंवा पाठिंबा देण्याचं काम नाही. या ठिकाणी एका वयोवृध्द व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ते त्या ठिकाणी त्यांचं दुकान उघडण्यासाठी आलेले होते, अशी माहिती आहे, याठिकाणी झाडं डेंजर झोनमध्ये दिसत होते, तसं पत्र देण्यात आलं होतं, मात्र पालिका प्रशासनाने यामध्ये लक्ष घातलं नाही. हा चौकशीचा भाग आहे, ती केली जाईल मात्र मी पुन्हा पुन्हा सांगते पालिकेमध्ये महायुती आहे, महापौर म्हणून मी असेल किंवा उपमहापौर म्हणून घाडी असतील किंवा इतर नगरसेवक आहेत, पण ज्या पध्दतीचं चित्र विरोधकांच्या माध्यमातून उभं केलं जात आहे, की, सत्ताधारी किंवा महापौर कंत्राटदारांना पाठिशी घातलं जातं आहे, असं वक्तव्य करून ते मुंबईकरांची दिशाभूल करत असतील तर त्याचा मी निषेध करते, असंही पुढे रितू तावडे म्हणाल्या आहेत.
सकाळी मला जेव्हा मुसळधार पावसाचा आणि अलर्टचा आढावा मिळाला तेव्हा मी एक व्हिडीओ करून लोकांना आवाहन केलं, आज उद्या परवा, तीन दिवस मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे आहे, त्यामुळे झाडांच्या खाली, विजेच्या खांबाखाली थांबू नका, मोठ्या झाडांखाली वाहनं पार्क करू नका असं आवाहन आम्ही आमच्या माध्यमातून आम्ही केलं आहे. एकीकडे आम्ही अशा घटना घडू नये म्हणून आवाहन करत आहे, या ठिकाणी राजकारण करू नये, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, राजकारण करून उपयोग नाही, तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं, हे बोलण्याची वेळ आहे का ही, ज्या पध्दतीने फोनोवरती, सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर किंवा मनसेचे असतील, महापौरांना काय इच्छा आहे का? की झाडं पडावं, मुंबईकरांना काय व्हावं अशी आमची इच्छा आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
“मुंबईत सध्या मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि समुद्राला आलेली हायटाईड यामुळे सर्व यंत्रणांवर ताण आहे. अशा परिस्थितीत आरोप-प्रत्यारोप करणे बंद करून विरोधकांनी मैदानात उतरून काम करावे. मी स्वतः आणि मुंबई महानगरपालिकेचा प्रत्येक अधिकारी २४ तास ‘वॉर फुटिंग’वर काम करत आहोत,” अशा शब्दांत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी शिवसेना (उबाठा) आणि मनसेवर तीव्र शब्दांत पलटवार केला.
मॅनहोल आणि झाडांच्या ऑडिटचे समर्थन
माध्यमांशी बोलताना रितू तावडे म्हणाल्या, “अचानक येणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे झाडे पडण्याच्या घटना घडत आहेत. मुंबईतील झाडांचे आणि प्रत्येक मॅनहोलचे, त्याच्या आतील जाळ्यांचे ऑडिट झालेच पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. माजी नगरसेवक यशोधर फणसे यांच्या वॉर्डमध्ये मॅनहोल उघडा ठेवून त्यात फक्त काट्या टाकल्या होत्या. मी त्यांना स्वतः जाळी लावून घेण्यास सांगितले. यंदा पाऊस उशिरा आला, मात्र गेल्या आठवड्याभरापासून अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडत आहे. अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात कोणाचीही दुर्घटना व्हावी अशी सत्ताधाऱ्यांची मुळीच इच्छा नसते. परंतु, विरोधकांनी आणि ‘उबाठा’ तसेच मनसेने ज्या पद्धतीचे गलिच्छ राजकारण सुरू केले आहे, त्याचा मी निषेध करते.”
किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारेंवर टीका
विशेष सभेच्या मुद्द्यावरून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या, “किशोरी ताई स्वतः माजी महापौर आहेत, त्यांना सभाशास्त्र माहिती असायला हवे. एखादे पत्र दिल्यानंतर सर्व २२७ नगरसेवकांपर्यंत अजेंडा पोहोचवण्यासाठी नियमानुसार तीन दिवस द्यावे लागतात. सर्व नियम माहिती असतानाही केवळ गलिच्छ राजकारणासाठी किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारे यांनी टीका सुरू केली आहे. मला त्यांची घृणा वाटते. मी जेव्हा त्यांना बाहेर पडून काम करायला सांगते, तेव्हा त्या केवळ फोनवर बोलतात. आणि मी स्वतः मैदानात उतरले तर मला ‘रील स्टार’ म्हणतात. मी ‘रील स्टार’ आहे की ‘रिअल स्टार’ हे माझे मुंबईकर ठरवतील. अंधारे यांनी दुसऱ्यांवर टीका करण्यापूर्वी आपल्या दिव्याखाली काय अंधार आहे तो पाहावा.”
“जनतेसाठी काम दाखवावेच लागते”
आपल्या सोशल मीडिया पोस्टचे समर्थन करताना महापौर म्हणाल्या, “आजचे लोकप्रतिनिधी कुठे फिरतात, नगरसेवक कुठल्या गल्लीत उभे आहेत, हे लोकांना दाखवावे लागते. जनता विचारते की तुम्ही कुठे आहात? त्यामुळे आम्हाला कामाचे व्हिडिओ शेअर करावे लागतात. महापालिका जे काम करतेय ते जनतेपर्यंत पोहोचवावे लागते. ‘खोटं बोला पण रेटून बोला’ ही नवी पद्धत ‘उबाठा’ने सुरू केली आहे, कारण त्यांची माणसे त्यांना सोडून चालली आहेत. सुषमा अंधारे म्हणतात ‘नाचता येईना अंगण वाकडे’, पण तुम्हाला तर नाचताही आले नाही आणि स्वतःची खुर्ची व अंगणही राखता आले नाही, अशी तुमची अवस्था आहे.”
२५ वर्षांच्या कारभाराचा हिशोब काढू!
गेल्या दोन महिन्यांतील नालेसफाई आणि रस्त्यांच्या कामाचा दाखला देत त्यांनी पालिकेचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आल्यापासून त्यांनी बैठकांचा दणका लावला आहे. त्या स्वतः विविध ठिकाणी भेटी देत आहेत. मुंबईतील २२६ नगरसेवक, ज्यात ठाकरेंचे आणि मनसेचेही नगरसेवक आहेत, सर्वच आपापल्या परीने काम करत आहेत. चेंबूरला मॅनहोलमध्ये बालकाचा मृत्यू झाला, याचे एक आई म्हणून मला प्रचंड दुःख आहे. पण जर तुम्ही यावरही राजकारण करणार असाल, तर मग आम्हालाही विरोधकांच्या २५ वर्षांच्या सत्ताकाळातील हिशोब काढावा लागेल की तेव्हा मॅनहोल आणि झाडे पडून किती निष्पाप लोकांचे बळी गेले.”
“ती माझी तत्परता होती, विरोधकांची विकृती उघडी पडली”
समुद्रकिनाऱ्यावरील एका प्रसंगाचा उल्लेख करत रितू तावडे म्हणाल्या, “काल रात्री जात असताना मला समुद्राच्या जवळील कठड्यावर काही लोक दिसले. अंगावर येणाऱ्या लाटा पाहून मी गाडी थांबवली आणि स्वतः धावत जाऊन त्यांना दोन्ही हातांनी खेचून सुरक्षित बाहेर काढले. पोलिसांनी माझ्या डोक्यावर छत्री धरली होती. विरोधकांना माझे ते काम दिसले नाही, तर केवळ पोलिसांच्या हातातील छत्री दिसली. यावरूनच विरोधक किती मानसिकदृष्ट्या आजारी आणि विकृत झाले आहेत हे दिसून येते. मी पुन्हा सांगते, मी ‘रील स्टार’ नसून केवळ जमिनीवर उतरून काम करणारी कार्यकर्ती आहे.”
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Comments are closed.