जालना–देऊळगाव राजा रोडवर भीषण अपघात, बोलेरोची छोटा हत्तीला जोरदार धडक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जालना–देऊळगाव राजा रोडवरील वाघरुळ शिवारात भरधाव वेगातील बोलेरो गाडीने छोटा हत्ती (मालवाहू वाहन) ला जोरदार धडक दिल्याने गंभीर अपघात झाला. छोटा हत्ती वाहन क्र. (MH 28 BB 1813) देऊळगाव राजा येथून जालन्याकडे येत असताना पाठीमागून आलेल्या बोलेरो वाहन क्र. (MP 09 AG 8952) हा डाक पार्सल वाहतूक करणाऱ्या वाहनाने ही धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की छोटा हत्ती वाहनाने दोन पलट्या मारल्या, तर बोलेरो गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलमध्ये जाऊन घुसली. या घटनेत हॉटेलचेही मोठे नुकसान झाले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बोलेरो चालक हा नशेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनाबाहेर काढले. तसेच बोलेरो चालकासह दोघांना संतप्त नागरिकांनी चोप दिल्याचीही माहिती आहे.

या अपघातात मुरलीधर लाहोरे (54) रा. देऊळगाव राजा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे जालन्यातील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मयताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जालन्यातील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.