प्रांजल खेवलकरांचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह, पण आता पोलिसांनी रोहिणी खडसेंना चौकशीला बोलावलं
रोहिणी खडसे: कथित रेव्ह पार्टी प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना जामीन मिळाला असला, तरी प्रकरणातील गुंतागुंत वाढताना दिसते आहे. आता या प्रकरणात त्यांच्या पत्नी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांची सिमकार्ड बदल प्रकरणात पुणे पोलिसांकडून (Pune Police) सखोल चौकशी करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये ‘सोनार’ नावाच्या व्यक्तीच्या नावे असलेले सिमकार्ड आढळले आहे. खेवलकर अटकेत असतानाच ‘सोनार’ या व्यक्तीने आपले सीम हरवल्याचा बनाव करत त्याच नंबरचे नवीन सीमकार्ड घेतले. हे सिम नवीन मोबाईलमध्ये टाकून व्हॉट्सॲपसह महत्त्वाचा डेटा डिलीट करण्यात आला, असा गंभीर आरोप पुणे पोलिसांकडून करण्यात आला आहे.
पोलिसांच्या दाव्यानुसार, हे संपूर्ण कृत्य रोहिणी खडसेंच्या सांगण्यावरून केल्याची माहिती ‘सोनार’ या व्यक्तीने चौकशीत दिली असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. मात्र, ‘सोनार’ नेमका कोण आहे, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.
Rohini Khadse : रोहिणी खडसेंची दीड तास चौकशी
या प्रकरणाशी संबंधित असल्याचा संशय असून, पुणे पोलिसांनी रोहिणी खडसे यांना नोटीस बजावली होती. त्यानुसार आज (6 ऑक्टोबर) त्यांची अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून दीड तास सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांचा लिखित जबाब नोंदवण्यात आला.
Rohini Khadse : वकील पुष्कर दुर्गे यांचे स्पष्टीकरण
चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना रोहिणी खडसे यांचे वकील पुष्कर दुर्गे यांनी सांगितले की, “पोलिसांनी विचारलेले प्रश्न आम्ही स्पष्टपणे उत्तरले आहेत. आम्ही कोणतेही अंमली पदार्थ घेतलेले नाही, हे फॉरेन्सिक रिपोर्टवरूनही सिद्ध झाले आहे. पुराव्यांची छेडछाड झाल्याचा जो संशय व्यक्त केला जातो आहे, त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही.” तसेच, “संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे अधिक माहिती देणं उचित ठरणार नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.
Pranjal Khewalkar : प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह
चौकशीनंतर रोहिणी खडसे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेण्यासाठी पोलीस मुख्यालयात दाखल झाल्या. ही भेट सुमारे 15 ते 20 मिनिटे चालली होती. दरम्यान, प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्यांनी कोणत्याही अंमली पदार्थांचा वापर केला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=ia4tyqh5x9q
आणखी वाचा
Pranjal Khewalkar: मोठी बातमी: एकनाथ खडसेंच्या जावयावरील सर्वात मोठा कलंक फॉरेन्सिकने पुसला
आणखी वाचा
Comments are closed.