‘महागाईच्या भडक्यात अजून तेल ओतल्याबद्दल सरकारचे आभार!’ सीएनजी दरवाढीवर रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या काही महिन्यांत सीएनजीच्या दरात टप्प्याटप्प्याने प्रति किलो 6.50 रुपयांची वाढ झाली असून, आता पुन्हा 2 रुपये प्रति किलो दरवाढ करून महागाईच्या भडक्यात आणखी भर घातल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. सरकारच्या या निर्णयावर उपरोधिक टीका करत त्यांनी ‘महागाईच्या भडक्यात अजून तेल ओतल्याबद्दल सरकारचे आभार’, असा टोला लगावला.

रोहित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत सरकारच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले. राज्यात सीएनजी पंपांची संख्या अपुरी असल्यामुळे वाहनचालकांना तासनतास पंपांवर रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जात असतानाच आता सीएनजीच्या दरात आणखी 2 रुपयांची वाढ करून सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार टाकला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘एसी गाड्यांमध्ये फिरणाऱ्या मंत्र्यांना सामान्यांच्या वेदना कशा समजणार?’, असा सवालही रोहित पवार यांनी केला. एसी गाड्यांमध्ये फिरणारे आणि एसी बंगल्यात बसून निर्णय घेणारे मंत्री सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांपासून दूर असल्याची टीका त्यांनी केली.

सीएनजीच्या दरवाढीचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिक, रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकांना बसणार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. महागाईच्या वाढत्या संकटात या दरवाढीमुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘सामान्य माणसाला होरपळून काढणारे हे सरकार सामान्य माणसाचा विचार करणार आहे की नाही? की केवळ स्वतःचेच खिसे भरणार?’, असा थेट सवाल रोहित पवार यांनी सरकारला केला आहे.

Comments are closed.