सत्तेचा अहंकार जनतेच्या ताकदीसमोर टिकणार नाही! बॅरीकेड्स लावून आंदोलन रोखण्याचा सरकारचा प्रयत्न; रोहित पवारांचा हल्लाबोल

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय देण्यापूर्वी या कर्जमाफी योजनेत अनेक जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींमुळे गरजू शेतकरी लाभापासून वंचिक राहण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना कोणतीही अट न ठेवता सरसकट कर्जमाफी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी 12 जूनपासून पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन करण्याचे नियोजन केले. मात्र हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलन स्थळी बॅरीकेट्स लावल्याचे दिसून आले. यावरून रोहित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आंदोलन स्थळाचे काही फोटो शेअर केले असून सरकारच्या दडपशाहीवर निशाणा साधला. विठुरायाची पंढरी सर्व भक्तांसाठी कायम खुली असतानाही, सरकार बॅरीकेड्स लावून आमच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार दिला आहे, त्यामुळे अन्नदात्यासाठी सुरू असलेल्या या ‘अन्नत्याग आंदोलनात’ सरकारने कितीही अडथळे आणले, तरी हे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

सरकारवर सत्तेचा अहंकार असल्याचा आरोप करत रोहित पवार म्हणाले की, सत्तेचा अहंकार जनतेच्या ताकदीसमोर कधीही टिकत नसतो, हे सरकारने लक्षात ठेवावे. उलट लढणाऱ्याचे हात धरून आणि बोलणाऱ्याचे तोंड दाबून सरकार सध्या स्वतःचाच पराभव सिद्ध करत आहे. या आंदोलनादरम्यान स्थानिक प्रशासनाकडून अडथळे निर्माण केले जात असले, तरी त्यामागे केवळ सरकारचा दबाव असल्याचे रोहित पवारांनी स्पष्ट केले.

सरकारला थेट इशारा देताना त्यांनी म्हटले आहे की, सरकारच्या दबावामुळे जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाकडून आमच्या मार्गात अडथळे आणले जात असले, तरी मनाने मात्र प्रशासनातील सर्वजण आमच्यासोबत आहेत, हे सरकारने विसरू नये, असे रोहित पवार म्हणाले.

शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी त्वरित काढा किंवा पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलनाला परवानगी द्या; रोहित पवार आक्रमक

Comments are closed.