सल्ले देण्यापेक्षा भाजपशासित राज्यांमधील उधळपट्टीवर लगाम लावा! मोदींच्या काटकसरीच्या सल्ल्यावरून रोहित पवारांचा सणसणीत टोला
सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीचे कारण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला खाद्य तेल कमी खाण्याचा आणि पेट्रोल-डिझेल जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार पलटवार केला आहे. सल्ला देण्यापूर्वी केंद्र सरकारने स्वतःसह भाजपशासित राज्यांमध्ये होणारी उधळपट्टी आणि भ्रष्टाचार थांबवावा, अशा शब्दांत रोहित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि भाजपशासित राज्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधानांचा काटकसरीचा सल्ला योग्य असला, तरी त्याची खरी सुरुवात सत्ताधारी पक्षाने स्वतःपासून करण्याची गरज असल्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
तेल कमी खा, पेट्रोल-डिझेल जपून वापरा, असा काटकसर करण्याचा सल्ला पंतप्रधान मोदी साहेबांनी देशाला दिला.. आजच्या युद्धजन्य परिस्थितीत हा सल्ला योग्य असला तरी याची सुरवात केंद्र सरकारने स्वतःसह देशातील सर्व भाजपशासित राज्यांनी केली तर ते अधिक योग्य ठरेल…
आता भाजपाने टार्गेट…
– रोहित पवार (@RRPSpeaks) 11 मे 2026
आता भाजपने टार्गेट ठेवलेल्या राज्यातील निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे ‘निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च करु नका’ असं आता म्हणता येणार नाही, पण ठराविक राज्यातील बड्या कंत्राटदारांना हाताशी धरून दलाली खाऊ नका… भ्रष्टाचार करु नका.. असे रोहित पवार म्हणाले. अनावश्यक वाहनांचा ताफा, अभ्यासाच्या नावाखाली होणारे परदेश दौरे आणि सरकारी पैशांची होणारी उधळपट्टी केंद्र सरकारने आधी भाजपशासित राज्यांमध्ये थांबवावी. जर सरकारने स्वतःचा भ्रष्टाचार आणि विनाकारण होणारा खर्च रोखला, तर सर्वसामान्य जनतेला काटकसर करण्याची वेळच येणार नाही, असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले.
देशाच्या परराष्ट्र धोरणाबाबतही रोहित पवारांनी सरकारला घेरले आहे. ‘चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे देश आर्थिक किंवा राजकीय अडचणीत येऊ नये, यासाठी सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन सहमतीने निर्णय घ्यावेत. असे केल्यास कुणी टीकाही करणार नाही आणि देशही सुरक्षित राहील’, असे त्यांनी सुचवले आहे. आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांनी केलेले आवाहन म्हणजे पेट्रोल-डिझेल दरवाढीचे संकेत असल्याची शंकाही त्यांनी उपस्थित केली.
Comments are closed.