तेलुगू चित्रपटसृष्टीवर शोककळा, भीषण अपघातामध्ये 2 कलाकारांचा जागीच मृत्यू
तेलुगू चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी येत आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर के. भरत कांत यांचे निधन झाले आहे. भरत कांत यांचे वय 31 वर्षे असून, त्यांच्यासोबत त्यांचे मित्र, सिनेमॅटोग्राफर आणि यूट्यूब कलाकार जी. साई त्रिलोक होते. जी. साई त्रिलोक हे देखील 31 वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे हैदराबादजवळील आदिबटला येथील आउटर रिंग रोडवर झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाला. आदिबटला पोलिसांच्या माहितीनुसार, भरत कांत कार चालवत होते. एक्झिट 12 जवळ त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कमी वेगाने जाणाऱ्या एका कंटेनर लॉरीला त्यांची धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की लॉरीची मागची चाके तुटून पडली आणि कारचे मोठे नुकसान झाले. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
दोघेही आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्याचे रहिवासी होते. ते हैदराबादच्या दिशेने जात असल्याचे सांगण्यात येत आहे. अति वेग आणि गाडी चालवताना आलेला थकवा यामुळे हा अपघात झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. अपघातानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, तपास सुरू आहे असे वृत्त आज तक ने दिले आहे.
भरत कांत हा इंडस्ट्रीतील एक उदयोन्मुख अभिनेता, नर्तक आणि कंटेंट क्रिएटर होता. त्याने ‘टेनंट’ आणि ‘ग्रामम’ यांसारख्या तेलुगू चित्रपट आणि लघुपटांमध्ये काम केले होते. साई त्रिलोक हा डिजिटल आणि चित्रपट प्रकल्पांसाठी सिनेमॅटोग्राफर होता. इतक्या तरुण वयात त्याच्या मृत्यूच्या बातमीने चाहते हादरले आहेत.
Comments are closed.