रोहित शर्मा 19 जुलैला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार; वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, टीम इ

रोहित शर्मा निवृत्ती: भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) अनुभवी सलामीवीर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स येथे होणारा तिसरा आणि निर्णायक वनडे सामना हा रोहित शर्माचा भारताकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो, असा दावा विविध माध्यमांच्या अहवालांमध्ये करण्यात आला आहे. (Ind vs Eng)

अहवालानुसार, भारतीय निवड समितीने 2027 च्या वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने नव्या खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला असून, रोहित शर्मा भविष्यातील योजनांचा भाग नसल्याचे त्याला कळवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धची सध्याची वनडे मालिका त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरची मालिका ठरू शकते.

दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला 4 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला- (Ind vs Eng ODI Series)

दरम्यान, कार्डिफ येथे झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये रोहितला मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्माने 26 धावा केल्या आणि भारतालाही चार विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली असून आता लॉर्ड्सवरील तिसरा वनडे निर्णायक ठरणार आहे. मात्र, रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत किंवा त्याला संघाबाहेर करण्याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेली चर्चा ही विविध वृत्तसंस्थांच्या अहवालांवर आधारित असून अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा आहे.

रोहित शर्माच्या अलीकडील कामगिरीवर प्रश्नचिन्ह- (Rohit Sharma ODI Format)

रोहित शर्माची अलीकडील वनडेमधील कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. मागील आठ वनडे सामन्यांत त्याने 241 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याची सरासरी 30.1, तर स्ट्राइक रेट 88.6 राहिला आहे. विशेष म्हणजे, या आठ सामन्यांत त्याच्या बॅटमधून केवळ एकच अर्धशतक झळकले आहे.

विराट कोहलीवर कायम विश्वास- (Virat Kohli ODI)

पीटीआयच्या वृत्तानुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर हे विराट कोहलीबाबत एकमत आहेत. कोहलीची सध्याची उत्कृष्ट फॉर्म आणि तंदुरुस्ती लक्षात घेता, विराट कोहली वनडे संघात आपोआप निवड होण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

रोहित शर्माची जागा यशस्वी जैस्वाल घेणार- (Rohit Sharma Retirement)

पीटीआयच्या माहितीनुसार, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर सध्या इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघासोबत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडकर्त्यांनी आता 2027 च्या वनडे विश्वचषकाच्या तयारीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून युवा खेळाडूंना अधिक संधी देण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे 39 वर्षीय रोहित शर्मा भविष्यातील योजनांचा भाग असण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे. बीसीसीआयमधील एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, निवडकर्त्यांना यशस्वी जैस्वालला सातत्याने संधी द्यायची आहे. त्याने तीन डावांत दोन शतके झळकावली आहेत. आगामी सुमारे 20 वनडे सामन्यांत त्याला पुरेशा संधी मिळाव्यात, अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक

Comments are closed.