भाजपची 'नारी वंदना'

महिलांना त्यांचे राजकीय हक्क नक्कीच मिळायला हवेत, पण त्यासाठी लोकसभेचे मतदारसंघ 543 वरून 850 करण्याची गरज नाही व संसदेत मतदार पुनर्रचना विधेयक कोसळल्यावर महिला आरक्षण कोसळले, असे बोंबलायची गरज नाही. भाजपचे ‘नारी वंदना’ प्रकरण एक ढोंग आहे.

 

महिलांवरील अत्याचार, लैंगिक शोषणाचे असंख्य अपराध यामुळे महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, असे चित्र दिसत नाही. गुंडांना सरकारची आणि कायद्याची भीती राहिलेली नाही. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार आहे, पण नारी शक्तीवरील अन्यायाचे खापर मुख्यमंत्री फडणवीस वगैरे नेते विरोधी पक्षांवर फोडत आहेत.

लोकसभेत मोदी-शहांनी मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक आणले. लोकसभेत सध्या 543 जागा आहेत. त्या वाढवून 850 जागा कराव्यात व 850 मतदारसंघ अमित शहांच्या मर्जीने तयार करणारा डिलिमिटेशन कमिशनर त्या जागेवर बसवायचा हे कारस्थान विरोधकांच्या एकजुटीने उधळण्यात आले. या सगळ्या प्रकरणाचा महिला आरक्षण विधेयकाशी संबंध नाही, तरीही मुंबईत एक महिलांचा मोर्चा काढून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ”काय हा अन्याय? महिलांना हक्क देणारे विधेयकच पाडले नाही, तर महिला उत्थानाची चळवळच विरोधकांनी संपवली.” विरोधी पक्षांविरुद्ध सत्ताधाऱ्यांनी मोर्चा काढून स्वत:चे हसे करून घेतले.

फडणवीस हे कायद्याचे पदवीधर आहेत. त्यामुळे विरोधकांनी कोणत्या विधेयकाचा पराभव केला हे त्यांना माहीत आहे, पण नारी शक्ती वंदन म्हणजे काय? महिला उत्थानाची चळवळ काय? महाराष्ट्रात नारी शक्तीने काय पराक्रम केले? याचा इतिहास माहीत नसल्याने भाजप तांडव करत आहे.

जबाबदारी घ्या

महाराष्ट्रातील नारी शक्तीचे ऊर्जास्थान श्री. फडणवीस असतील तर त्यांनी काही गोष्टींची जबाबदारी घ्यायला हवी.

भाजपचा प्रचारक असलेला नाशिकचा खरात बाबा गेल्या तीनेक वर्षांपासून असंख्य महिलांचे शोषण, अत्याचार करीत होता. भाजप सरकारने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले, पण एकनाथ शिंदे त्या बाबाकडे जातात व आपल्याविरुद्ध जादूटोणा, होमहवन करतात ही पक्की खबर आल्यावर मुख्यमंत्र्यांनी खरात बाबावर कठोर कारवाई केली. कारवाई केली याबद्दल त्यांचे अभिनंदन, पण सत्य हे असेसुद्धा आहे. कारवाई योग्य वेळी का झाली नाही?

मुंबईसह राज्यात नशेचा बाजार वाढला आहे. तरुणांपर्यंत उघडपणे नशेच्या गोळ्या पोहोचत आहेत. त्यात अनेक मुलांनी जीव गमावले. या नशेच्या व्यापाराची सूत्रधार एक ‘नारी’ अश्विनी पाल निघाली. या नारी शक्तीचे आता काय करणार? पोलीस कारवाई आता झाली, पण तोपर्यंत मोठे नुकसान झाले आहे.

भाजपची महिला उत्थानाची आणि महिलांना हक्क देण्याची व्याख्या वेगळी आहे. निवडणुकीच्या आधी महिलांच्या खात्यावर 1500 ते 10 हजार रुपये टाकून आपणच महिलांचे तारणहार आहोत हे सांगणे म्हणजे नारी शक्ती वंदन असा त्यांचा समज आहे. अशा प्रकारे महिलांना स्वावलंबी बनवण्याऐवजी राजकीय गुलाम व परावलंबी केले गेले. बिहार निवडणुकीच्या आधी मतदान सुरू असताना पंतप्रधान मोदी यांनी एक कोटी महिलांच्या खात्यांवर 10 हजार रुपये वळवले व त्या बदल्यात भाजपला मते घेतली. महाराष्ट्रात तेच झाले, पण तेच मोदी `नारी’ शक्तीच्या बाबतीत किती संवेदनशील आहेत ते पहा –

– श्री. मोदी यांनी त्यांच्या पत्नी जसोदाबेन यांना त्यांचे हक्क कधीच मिळू दिले नाहीत.

– पंतप्रधान झाल्यावरच मोदी हे त्यांच्या वृद्ध आईला भेटायला जाऊ लागले. तेसुद्धा कॅमेऱ्यांचा लवाजमा घेऊन.

– मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या राज्यात सर्वाधिक कुपोषित महिला होत्या. त्यावर मोदी म्हणत, “कुपोषित महिलांची चिंता करू नका. इकडच्या महिलांना त्यांची `फिगर’ राखायची आहे म्हणून त्या सडपातळ आहेत.”

– मोदी यांनी राजकारणातील प्रतिष्ठित महिलांना ‘विधवा’, ‘जर्सी गाय’, ‘शूर्पणखा’, ’50 कोटींची गर्लफ्रेंड’ अशा उपाध्या देऊन अपमानित केले.

– मणिपूर आजही पेटले आहे व महिलांची विटंबना भररस्त्यावर केली जात आहे. मोदींसह संपूर्ण भाजप मणिपुरातील महिला अत्याचारांवर गप्प आहे.

– अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या जेफ्री एपस्टीनचे खास मित्र आजही मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत.

– लेखिका व पत्रकार मधू किश्वर यांनी मोदींसंदर्भात केलेली वक्तव्ये दुर्लक्ष करता येण्यासारखी नाहीत.

– लोकसभेत सध्या 543 खासदार आहेत. याच संख्येत महिलांना 33 टक्के आरक्षण द्यावे ही विरोधकांची भूमिका योग्य असताना मोदी त्या भूमिकेस विरोध करतात. कारण त्यांना महिलांना आरक्षण मिळावे असे मनापासून वाटत नाही.

– नारी शक्तीला एवढाच बहुमान द्यायचा असेल तर देशाच्या पंतप्रधानपदी एखादी सक्षम महिला व महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांच्या मुख्यमंत्रीपदी महिला नेत्यांना बसवावे. `नारी’ आपोआपच शक्तिमान होतील.

– बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या (हाथरस बलात्कार प्रकरण) कुलदीप सेंगरचे समर्थन भाजपचेच एक खासदार निशिकांत दुबे करतात. मोदी यांना महिलांच्या अब्रूची निघालेली ही लक्तरे मान्य आहेत का?

भारतीय जनता पक्षाला `नारी शक्ती’च्या नावाखाली राजकारण करायचे आहे हे आता स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकर यांनी नारी शक्तीला ताकद दिली. या तिन्ही विभूतींच्या विचारांशी भाजपचा संबंध आला नाही.

यज्ञमूर्तींचा अपमान

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या एक आदिवासी महिला आहेत, पण अयोध्येतील राममंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यात व नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रपतीरूपी नारी शक्तीला साधे निमंत्रणही नव्हते. हे का? सध्या भारतीय नारीचा फक्त मतपेढी व राजकीय गैरवापर सुरू आहे. भारतीय संस्कृती सर्वत्र मातृवंदन करीत आहे. भाजप `भ्रूण’ अवस्थेतही नव्हता तेव्हापासून `मातृभूमी’ `मातृदेवो भव’ असे आम्ही बोलतोय. भारत म्हणजे आई. भारतवर्षात सर्वत्र मातेचा आणि पत्नीचा महिमा आहे.

भाजपने या त्यागमूर्ती महिलांचा कधी सन्मान केला आहे काय?

भाजपला निवडणुका जिंकण्यासाठी निवडणुका जिंकणारी, जिंकल्यावर ‘नमो नमो’ भजनात दंग होणारी, देवाभाऊंच्या नावाने चिपळ्या वाजवणारी नारी शक्ती हवी आहे.

हे ढोंग आहे. त्या ढोंगाचा लोकसभेत पराभव झाल्याबद्दल झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, महाराणी ताराराणी, इंदिरा गांधी स्वर्गात खूश झाल्या असतील.

ट्विटर – @rautsanjay61

Gmail- rautsanjay61@gmail.com01

Comments are closed.