कोलकातामध्ये बांधकाम सुरू असलेल्या गोदामाचे छत कोसळले.
कोलकात्यात निर्माणाधीन गोदामाचे छत कोसळले
वृत्तसंस्था/ कोलकाता
दक्षिण कोलकातामधील ताराताला ट्रान्सपोर्ट डेपोजवळ बांधकाम सुरू असलेल्या एका गोदामाचे शेड बुधवारी दुपारी 1:30 वाजता अचानक कोसळले. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तसेच अन्य 50 ते 55 जण अडकल्याची भीती व्यक्त होत असतानाच सायंकाळपर्यंत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 13 जणांना वाचवण्यात आले. जखमींपैकी नऊ जणांना उपचारासाठी एसएसकेएम रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.
गोदाम कोसळण्याच्या दुर्घटनेवेळी गोदामात काँक्रीट ओतण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता पोलीस, आपत्ती व्यवस्थापन गट, नागरी संरक्षण, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि लष्कर देखील बचावकार्यात सहभागी झाले आहेत. ढिगारा आणि लोखंडी सळ्या काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली होती. लोखंडी सळ्या कापण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला. ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या किंकाळ्याही ऐकू येत असून, त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी गोदामाच्या छतावर ओतकाम सुरू होते. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याची रचना पूर्ण झाली होती आणि तळमजल्यावर बांधकाम सुरू होते. याचदरम्यान अचानक संपूर्ण इमारत कोसळल्यामुळे जड लोखंडी बीम आणि काँक्रीटच्या ढिगाऱ्यात कामगार गाडले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, गोदामाची जमीन ओडिशाच्या एका व्यापाऱ्याची होती. त्याने ती एका खासगी कंपनीला भाडेतत्त्वावर दिली होती.
मंत्री-अधिकारी घटनास्थळी
अपघाताची तीव्रता लक्षात घेता, नगरविकास मंत्री अग्निमित्र पॉल, कोलकाता महानगरपालिका आयुक्त स्मिता पांडे आणि मंत्री इंद्रनील खान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. भाजप नेते राकेश सिंह हेही उपस्थित होते. ‘सध्या आमचे पहिले प्राधान्य शक्य तितक्या लोकांचे प्राण वाचवणे हे आहे. अपघाताचे कारण आणि कोणत्याही अनियमिततेची चौकशी नंतर केली जाईल’, असे मंत्री इंद्रनील खान म्हणाले.
युद्धपातळीवर बचावकार्य
मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले. कोलकाता पोलीस, आपत्ती व्यवस्थापन गट, नागरी संरक्षण आणि अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली. लष्करी अधिकारीही बचावकार्यात मदत करत होते. मोठा ढिगारा हटवण्यासाठी क्रेन आणि मोठी यंत्रसामग्री तैनात करण्यात आली होती.
निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप
गोदामाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने केला आहे. याला मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनीही दुजोरा दिला आहे. कमी दर्जाचे लोखंड आणि अन्य साहित्य वापरल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट केले. याचदरम्यान, स्थानिक रहिवाशांनी या परिसरात बऱ्याच काळापासून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याचा आरोपही केला आहे.
‘माझा पाय कापा पण मला वाचवा’
अपघातानंतरच्या बचावकार्यादरम्यान, अंकित सिंग नावाच्या एका तरुणाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराला शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने जखमी कामगाराचा पाय पकडला आणि बचाव पथकाला त्याचे नेमके ठिकाण शोधण्यात मदत केल्यानंतर बचाव पथकाने त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न तीव्र केले. ढिगाऱ्याखाली अडकलेला कामगार वेदनेने विव्हळत होता. ‘माझा पाय पूर्णपणे अडकला आहे. गरज पडल्यास, उरलेला भाग कापून मला बाहेर काढा. पण माझा जीव वाचवा’ असे तो वारंवार ओरडत होता.
हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला
या दुर्घटनेनंतर मंत्री अग्निमित्र पॉल आणि मंत्री कौशिक चौधरी हेसुद्धा घटनास्थळी पोहोचले होते. राज्य सरकारने लोकांना मदत करण्यासाठी 1070, 8697981070 आणि 033-22143526/22535185 हे हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत, असे त्यांनी सांगितले
Comments are closed.