जेतेपदाचा राजयोग, वर्चस्वाचा अजिंक्ययोग

>> मंगेश वरवडेकर

सतरा वर्षं… एखाद्या प्रियकराने प्रेयसीची वाट पाहावी तशी वाट पाहिली होती त्यांनी. दारात रांगोळी काढून, फुलांचा हार घेऊन, प्रत्येक वर्षी ‘यंदा ती येईल’ या आशेवर उंबरठ्यावर उभं राहावं आणि प्रत्येक वेळी निराशेचा दरवाजा बंद व्हावा, तसं आयुष्य होतं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अर्थात आरसीबीचं.

जगातले सर्वोत्तम स्टार फलंदाज, आग ओकणारे गोलंदाज आणि चाहत्यांचा असा महासागर की, पुंभमेळाही फिका पडावा. सारं काही होतं. फक्त नव्हती ती एक सोनेरी ट्रॉफी. ती ट्रॉफी म्हणजे आरसीबीसाठी मृगजळ होती. वाळवंटातल्या तहानलेल्या प्रवाशाला जसं पाणी दिसतं, पण हातात लागत नाही तसं.

एकामागून एक मोसम गेले. एकामागून एक दिग्गज आले. एबी डिव्हिलियर्स नावाचा क्रिकेटमधला मायावी जादूगार आला, ख्रिस गेल नावाचं वादळ आलं, स्टार्कचे यॉर्कर आले, पण ट्रॉफी मात्र हाताला लागली नाही. आरसीबी म्हणजे आयपीएलच्या बाजारातला राजा, पण मैदानातला भिकारी. प्रत्येक वर्षी हातातोंडाशी आलेला घास नियती हिरावून घ्यायची. पण नियतीलाही कधीतरी प्रेम येतंच ना. ते गेल्या वर्षीही आलं आणि यंदाही. आधी 17 वर्षे ग्रह-तारे जुळत नव्हते, पण तो राजयोग 18 व्या वर्षी आला. एकदा राजयोग आला की तो टिकतोच असं नाही. अनेकांच्या पुंडलीत सिंहासनयोग असतो, पण राज्य टिकवण्याचा अजिंक्ययोग नसतो. आरसीबीच्या नशिबी मात्र हे योग आले. एकत्र आले. योगायोगाने आले.

कधी नव्हे ते जुळलेल्या ग्रह-ताऱयांनी गेल्या वर्षी अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर  त्यांच्या कपाळावर विजयाचा टिळा लावला. सतरा वर्षांची तपश्चर्या एका क्षणात फळाला आली. आणि यंदा? यंदा तर त्यांनी गुजरात टायटन्सला हरवून इतिहासावर दुसऱयांदा स्वतःचं नाव कोरलं. सिंहासन मिळवणं अवघड असतं. त्याचं महत्त्व आरसीबीला चांगलंच आहे, पण ते राखणं त्याहून अवघड असतं. इतिहासात अनेक राजे आले, राज्य जिंकले, पण मुकुट (राज्य) टिकवू शकले नाहीत. विराट कोहली आणि त्याच्या आरसीबीने ते करून दाखवलं. जणू एखाद्या योद्धय़ाने रणांगणात मिळवलेलं राज्य पुन्हा शत्रूंपासून वाचवलं. मात्र या विजयाचा एक शांत नायक आहे. तो रजत पाटीदार. विराट सूर्य असेल, तर पाटीदार हा त्या सूर्याला साथ देणारा ध्रुव तारा. त्याच्या नेतृत्वाने या संघाला स्थैर्य दिलं. त्याचा उल्लेख न करणं म्हणजे विजयाच्या गाण्यातला एक महत्त्वाचा सूर विसरणं ठरेल.

आरसीबी हा पहिल्या हंगामापासून आयपीएलचा सुपरस्टार संघ होता. पण पडद्यावरचा हीरो आणि आयुष्याचा हीरो यात फरक असतो. वर्षानुवर्षं ‘पुढच्या वर्षी कप नक्की’ म्हणत विरोधकांनी त्यांची खिल्ली उडवली, सोशल मीडियावर विनोद झाले, मीम्स झाले. पण गेल्या वर्षी आरसीबीने त्या सगळय़ा आवाजांना कुलूप लावलं आणि यंदा तर त्यांनी त्या कुलपाची किल्लीच फेकून दिली.

मोदी स्टेडियममध्ये पुन्हा एकदा ‘आरसीबी… आरसीबी…’चा गजर घुमला तेव्हा तो फक्त आवाज नव्हता; तो लाखो चाहत्यांच्या डोळय़ात साठलेल्या अश्रूंचा जल्लोष होता. या कहाणीचा सर्वात सुंदर अध्याय म्हणजे विराट कोहली. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून एकाच जर्सीत राहणारा हा वेडा माणूस. क्रिकेटच्या भाषेत त्याला फलंदाज म्हणतात. पण आरसीबीसाठी तो मंदिरातील नंदादीप आहे. बाकी सारे आले, गेले, निवृत्त झाले, विस्मृतीत गेले, पण विराट मात्र तसाच उभा राहिला. वादळात न हलणाऱया वडाच्या झाडासारखा. समुद्रातल्या दीपस्तंभासारखा. यंदाही त्याने धावांचा पाऊस पाडला, अर्धशतकांचे हार गुंफले, संघ अडचणीत असताना खांदा दिला. अंतिम सामन्यात दडपणाचं आभाळ डोक्यावर कोसळत असताना त्याची बॅट एखाद्या अनुभवी सेनापतीच्या तलवारीसारखी चमकत होती. प्रत्येक धावेत अनुभव होता, प्रत्येक फटक्यात शहाणपण होतं.

आरसीबीची कहाणी म्हणजे झिजण्याची, पडण्याची, उठण्याची आणि पुन्हा लढण्याची कहाणी आहे. 2009, 2011 आणि 2016 मध्ये ट्रॉफी त्यांच्या हातातून निसटली होती. अनेक संघ हरतात. पण सगळेच लढवय्ये नसतात. आरसीबी लढवय्या होती. म्हणूनच ती चाहत्यांच्या हृदयात जगत राहिली.

अखेर 18 व्या वर्षी संयमाला फळ मिळालं आणि 19 व्या वर्षी ते फळ अमृताहूनही गोड झालं. ‘भगवान के घर देर है, अंधेर नहीं’ हे वाक्य आपण हजार वेळा ऐकलं असेल, पण त्याचा अर्थ काय असतो हे आरसीबीने जगाला दाखवून दिलं. गेल्या वर्षी जेतेपदाचा सूर्य उगवला. यंदा तो मध्य आकाशात पोहोचला. वर्षानुवर्षं दुसऱयांच्या हातात मिरवणारी ट्रॉफी आता त्यांच्या कपाटात स्थिरावली आहे. पूर्वी ट्रॉफी त्यांच्याकडे पाहून हसायची. आता ती त्यांच्याच घरात राहते.

देव आणि दैव दोन्ही सोबत असले की काय घडू शकतं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे आरसीबी. आयपीएलच्या बाजारात तो संघ नेहमीच राजा होता. आता मैदानावरही ते राजा झाला आहे, पण राजांना एका विजयावर समाधान नसतं. आता त्यांनी जराही थांबायचं नाही. पुढच्या वर्षी जेतेपदाची हॅटट्रिक साकार करण्यासाठी ते आतापासूनच तयारीला लागले तर कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. कारण त्यांना पुन्हा एकदा ‘इ साला कप नमदे’चा जयघोष करायचाय. कारण इतिहास विजेत्यांना लक्षात ठेवतो, पण साम्राज्य उभं करणाऱयांना अमर करतो.  खरा राजा तोच… ज्याचं राज्य कधी संपत नाही!

Comments are closed.